close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Updated: Apr 15, 2019, 06:54 PM IST
Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा हा अभिनेता 'बाहुबली' या विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटातून विविधभाषी प्रेक्षकांचीही मनं जिंकून गेला. येत्या काळात तो 'आशिकी गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत तो स्क्रीन शेअर करत असून, 'साहो' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 

'साहो'च्या सेटवरील फार कमी फोटो किंवा व्हिडिओ आतापर्यंत सर्वांसमोर आले आहेत. जे या घडीला प्रभास आणि श्रद्धाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीविषयी बरंत काही सांगून जात आहेत. या फोटोमध्ये प्रभास आणि श्रद्धाची एकमेकांवरुन नजर हटताना दिसत नाही आहे. निळ्या नभाखाली त्यांची ही केमिस्ट्री पाहता 'साहो'च्या निमित्ताने एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाल्याचं प्रतित होत आहे. 

सुजिथने लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचत्या निर्मितीची धुरा युव्ही क्रिएशन्स, टी सीरिज आणि धर्मा प्रोडक्शन्सने सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त नील नितीन मुकेश, अरुण विजय आणि एवलिन शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. एकाच वेळी हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साहोच्या निमित्ताने श्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे सर्वावार्थाने 'साहो' प्रदर्शनापूर्वीच कुतूहलाचा विषय ठरत आहे. जवळपास ३०० कोटींच्या निर्मिती खर्चातून साकारला जाणारा हा चित्रपट १५ ऑगस्ट, २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.