मुंबई : 'बाहुबली' या अद्वितीय कलाकृतीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे एस.एस. राजामौली येत्या काळात 'आरआरआर' या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाविषयी आता आणखी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
मुळातच राजामौली यांचे चित्रपच त्यांच्या कथानक आणि त्याच्या भव्य सेटसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाविषयीसुद्धा प्रेक्षकांना अशाच काही अपेक्षा होत्या, ज्या आता येत्या काळात पूर्ण होणार आहे. कारण, एक अफलातून साहसी दृश्य या चित्रपटाच्या निमित्ताने साकारण्यात येणार आहे. ज्यासाठी एक, दोन नव्हे तर तब्बल ४५ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ज्यादरम्यान राजामौली आणि त्यांच्या टीमने बऱ्याच ठिकाणांना भेट दिली. आता प्री व्हिज्युअलायझेशन आणि प्रशिक्षणानंतर अनेक कलाकारांच्या आणि फायटर्सच्या साथीने अखेर या चित्रपटातील सर्वात मोठं साहसी दृश्यं चित्रीत करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांच्या लांबलचक वेळापत्रकारम्यान या दृश्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दोन्ही महत्त्वाचे अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्याशिवाय या दृश्यात एकूण दोन हजार कलाकारांचा सहभाग असणार आहे. या चित्रपटातील काही आकर्षक आणि मुख्य गोष्टींपैकी एक म्हणजे हे साहसदृश्य ठरणार आहे.
अनेक परदेशी कलाकारांचाही या दृश्यात सहभाग असणार आहे. जे या चित्रपटाच्या क्र्यूचाही भाग असतील. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत हे चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आतापासूनच या दृश्याविषयीची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.