Leaders : रस्त्यावर पेन विकली, कारखान्यात काम केलं, कठोर संघर्षानंतर बनला प्रसिद्ध कॉमेडियन

कॉमेडियनच्या संघर्षाची कहाणी...

Updated: Nov 10, 2021, 09:25 PM IST
 Leaders : रस्त्यावर पेन विकली, कारखान्यात काम केलं, कठोर संघर्षानंतर बनला प्रसिद्ध कॉमेडियन  title=

मुंबई : अभिनेता जॉनी लीव्हरचं नाव ऐकल्यावरच आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. चित्रपटात साकारलेली त्यांची पात्रं डोळ्यासमोर तरळू लागतात. 300 हून अधिक चित्रपट केलेल्या जॉनी लीव्हरला त्यांच्या कामासाठी 13 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. एवढेच नाही तर त्याला बॉलिवूडचा पहिला स्टँड-अप कॉमेडियन देखील म्हटलं जातं. पण, तुम्हाला माहिती आहे का की, एकेकाळी जॉनी लीव्हर हा खूप गरीब माणूस होता. इथपर्यंत पोहचायला अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला होता.

गरिबीमुळे तो सातवीपर्यंतच शाळेत जाऊ शकला. पोटासाठी तो एका कारखान्यात काम करत असे. अगदी रस्त्यावर पेन विकत असे. कॉमेडियन, अभिनेता बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. जॉनी लीव्हर उर्फ ​​जॉनी प्रकाश यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील एका सामान्य कुटुंबात झाला. जॉनी दोन भाऊ आणि तीन बहिणींमध्ये सगळ्यात मोठा होता. त्याचे वडील प्रकाश राव जनमुला हे मुंबईतील हिंदुस्थान लिव्हर फॅक्टरीत काम करून घर चालवायचे. जॉनीला शिकता यावं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवलं.

पण, जॉनी जास्त काळ शाळेत जाऊ शकला नाही. पैशाअभावी त्याला ७वी नंतर शाळा सोडावी लागली. शाळा सोडल्यानंतर वडिलांना मदत करण्यासाठी त्याने सुरुवातीचे काही दिवस रस्त्यावर पेन विकली. नंतर कारखान्यात कामाला लागले. जॉनी लहानपणापासूनच कलाप्रेमी होता. रस्त्यावर पेन विकताना तो अनेकदा मोठ्या-मोठ्या फिल्म स्टार्सची नक्कल करायचा. जसजसा तो मोठा होत गेला तसतशी त्याची प्रतिभा समोर येत गेली.

वडिलांसोबतच्या नोकरीच्या काळात त्याला त्याच्या मिमिक्रीसाठी स्टेज शोसाठी बोलावलं जाऊ लागलं. या कामासाठी त्याला पैसेही मिळत होते. अशाच एका स्टेज शोदरम्यान त्याची भेट बॉलिवूड अभिनेता संजय दत्तशी झाली आणि तिथून त्याचं आयुष्यच बदलून गेलं. संजय दत्तच्या मदतीने जॉनीला 1989 मध्ये 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात जोसेफची भूमिका मिळाली होती. जी त्याने चांगली गाजवली होती. त्याच्या कामाचं खूप कौतुकही झालं. आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ईथूनच त्याच्या यशाचा प्रवास सुरु झाला आणि तो बॉलिवूडचा पहिला कॉमेडियन बनला.