मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या का केली? त्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी मुंबईतील मोठ्या निर्मात्यांनी सुशांत सिंह राजपूतवर बहिष्कार घातला होता याचीही चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या दृष्टीकोनातून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अकरा व्यक्तिंचे जबाब नोंदवले आहेत. त्यात त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि मित्रांचा समावेश आहे. यामध्ये सुशांतचे वडील के. के. राजपूत यांचाही जबाब नोंदविला गेला.
सुशांतच्या नैराश्याबाबत तुम्हाला काही माहित आहे का?असा प्रश्न केके सिंग यांना चौकशी दरम्यान विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, सुशांतच्या नैराश्याबाबत मला काहीच कल्पना नाही शिवाय कुटुंबाला देखील सुशांतच्या नैराश्याबाबत आणि मानसिक तणावाबाबत काहीच माहित नसल्याचा दावा केके सिंह यांनी केला आहे.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. परंतु तो गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत असल्याचा दावा त्याच्या बहिणीने केला होता. पोलीस याप्रकरणाची कसून तपासणी करत आहेत.
सुशांतच्या घरी स्वयंपाक करणारी, घरकाम करणारा आणि त्याचा मॅनेजर यांचा देखील जबाब नोंदविण्यात आला आहे. सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेवून आपले जीवन संपवले. परंतु अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही.