मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वांद्रे पोलीस सुशांत सिंग राजपूतच्या घरी पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने सकाळी ११ ते ११.३०च्या वेळेत गळफास लावून आत्महत्या करून घेतली. सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे. पोलिसांनी याबाबत अजूनही अधिकृत माहिती दिलेली नाही. याशिवाय पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडियाचाही तपास करायला सुरुवात केली आहे.
सुशांत बऱ्याच कालावधीपासून सोशल मीडियापासून लांब आहे. सुशांतने शेवटचं ट्विट २७ डिसेंबर २०१९ ला केलं होतं. यानंतर तो ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हता. इन्स्टाग्रामवर त्याने शेवटची पोस्ट ३ जूनला केली होती. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटो शेयर केला होता.
दुसरीकडे सुशांतचं गाव असलेल्या पूर्णियामध्ये त्याच्या कुटुंबाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सुशांतने आत्महत्या केल्याचं समजलं आहे. सुशांतचं कुटुंब पटण्यावरून मुंबईला जायची तयारी करत असल्याचं सुशांतचा चुलतभाऊ बबलूने सांगितलं.