मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांतचा मृतदेह मुंबईतल्या डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. या हॉस्पिटलमध्ये सुशांतचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
सुशांतने वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकलं नाही तरी तो नैराश्येत असल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. सुशांत सिंग राजपूतला पंख्याला लटकलेलं सगळ्यात पहिले त्याच्या नोकराने पाहिलं. यानंतर त्याने लगेच पोलिसांना फोनकरून याबाबत माहिती दिली.
सुशांतने आत्महत्या केली तेव्हा तो घरात एकटाच नव्हता. सुशांतचे काही मित्रही त्याच्यासोबत घरात होते, अशी माहिती मिळत आहे. घरातल्या मित्रांनी सुशांतच्या खोलीचा दरवाजा तोडला. सुशांतला पंख्याला लटकलेला पाहिल्यानंतर मित्रांनी त्याला खाली उतरवण्याचाही प्रयत्न केला.
पोलिसांना माहिती मिळताच ते सुशांतच्या घरी पोहोचले. पोलिसांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने ११ ते ११.३०च्या दरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सुशांतने चिठ्ठी लिहिली का? याचा तपासही पोलिसांनी केला, पण त्यांना अशी कोणतीही चिठ्ठी अजूनपर्यंत मिळाली नाही.
पोलीस सुशांतचा नोकर, त्याचे मित्र आणि शेजाऱ्यांचा चौकशी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली असून अजूनतरी काही संशयास्पद आढळलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुशांत सिंग राजपूतवर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.