मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची एन्ट्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान या स्टारकिड्सने तर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. काही स्टारकिड्स कलाकार म्हणून प्रसिद्धीझोतात आले तर काहींच्या वाट्याला मात्र अपयश आलं. आता पुन्हा एका स्टारकिडने आपला मोर्चा कलाविश्वाकडे वळवला आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी सेन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर रिनीचे शुटिंगदरम्यानचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून रिनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता सेटवरील फोटोंनी सर्वांना चकीत केलं आहे. रिनी २१ वर्षांची असून ती 'सुट्टाबाजी' नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
अद्याप चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या फोटोंच्या माध्यमातून रिनी शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या आई-वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
तर रिनीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक कबीर खुराना यांच्या खांद्यावर आहे. महत्त्वाचं 'सुट्टाबाजी' चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.