कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. मागच्या 24 तासात या प्रकरणात काय काय घडलं पाहुयात या रिपोर्टमधून.
कल्याणमधील योगीधाम सोसायटीत धुप लावण्यावरुन जाब विचारल्यानं मराठी कुटुंबाला गुंड आणि परप्रांतीय शेजाऱ्यांकडून रॉडनं मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चहूबाजूंनी संताप व्यक्त केल्यावर पोलीस खातं खडबडून जागं झालं. तर 2 दिवस फरार असलेला आरोपी अखिलेश शुक्लानं शुक्रवारी आत्मसमर्पण केलं. त्याची पत्नी गीतालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज कल्याण कोर्टात हजर केल्यावर कोर्टानं शुक्ला दाम्पत्यासह सर्व आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच आणखी आरोपी पकडणं बाकी असून, आरोपींकडून मारहाणीवेळची शस्त्र ताब्यात घेणं बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं.
त्याआधी सरकारी नोकरीचा माज दाखवून धमकावणाऱ्या अखिलेश शुक्लाला कारवाईचा दणका बसला. खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची अंबर दिवा लावलेली गाडी जप्त केली. कोणताही अधिकार नसताना हा शुक्ला आपल्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. धक्कादायक म्हणजे त्याच्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आणि PUC काढलेली नव्हती. त्यावर 9 हजार 500 रुपयांचा दंड पोलिसांनी ठोठावलाय.
खडकपाडा पोलिसांकडून शुक्लाची अंबरदिवा असलेली गाडी जप्त
अधिकार नसताना शुक्लाकडून अंबरदिव्याचा अवैध वापर
शुक्लाच्या गाडीचा इन्शुरन्स, PUC 4 वर्षापूर्वीच संपलेला
पोलिसांकडून शुक्लाला 9,500 रुपयांचा दंड
परप्रांतियांच्या मुजोरीच्या अनेक घटना वरचेवर मुंबई ठाण्यात घडतंच असतात.. मात्र महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे नोकरी व्यवसाय बळकावणं, त्यांना सोसायट्यांमध्ये घरं न देणं, त्यांच्या खाण्यापिण्यावरुन राहण्यावरुन मराठी माणसाची लायकी काढणं हे आता खपवून घेतलं जाणार नाही हे ठासून सांगण्याची वेळ आली आहे. तेव्हा कोर्टानं शुक्ला दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली असली तरी इथून पुढे मराठी माणसावर विनाकारण हात उचलण्याची कुणाची हिंमत होणार नाही असा धडा शिकवणं गरजेचं आहे.