मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) देशातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेली मालिका आहे. मालिकेतील जेठालाल, टप्पू, भिडे असे कोणतं पात्र नाही जे तुम्हाला माहिती नाही. या पात्रांनी सर्वांना पोट घरून हसण्यास भाग पाडलं. टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकताचं मालिकेने 3300 एपिसोड पूर्ण केले आहेत.
त्यामुळे खास क्षणाचं औचित्य साधत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. एवढंच नाही तर प्रेक्षकांना कायम हसवत ठेवणार असं आश्वासन देखील दिली आहे. गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना स्वतःचे दुःख विसरून हसवण्याच्या या प्रवासात अनेकांनी साथ सोडली.
पण मालिकेने कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी प्रवास सुरू ठेवत 3300 एपिसोड पूर्ण केले. यावर असिद मोदी म्हणाले, 'तारक मेहता का उल्टा चष्मा फक्त एक शो नाही तर एक भावना आहे. मालिकेने 3300 एपिसोडचा टप्पा गाठला आहे.
मोदी पुढे म्हणाले, आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शो गेल्या तेरा वर्षांत लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात यशस्वी झाला आहे. इतक्या वर्षांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल मी सर्व प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानतो... पुढे देखील असे अनेक एपिसोड तुमच्या भेटीस येतील ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहते कायम हसत राहतील...'
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका 28 जुलै 2008 रोजी सुरू झाली आणि आता 13 वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे चालू आहे. ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय सिटकॉमआहे. या वर्षाच्या सुरुवातीला मालिकेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही एन्ट्री केली आहे.