अभिनेत्रीकडून ज्युनिअर आर्टिस्टवर बलात्काराचा आरोप

अंमली पदार्थ देऊन तिच्यावर.... 

Updated: Nov 19, 2019, 05:57 PM IST
अभिनेत्रीकडून ज्युनिअर आर्टिस्टवर बलात्काराचा आरोप
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'कहानी घर घर की', 'देस में निकला होगा चाँद', 'नच बलिये' या कार्यक्रमांचा भाग असणाऱ्या एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने ज्युनिअर आर्टिस्टवर गंभीर आरोप केले आहेत. 'टाईम्स नाऊ'च्या वृत्तानुसार ज्युनिअर आर्टिस्टने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. सध्याच्या घडीला आरोप करण्यात आलेला ज्युनिअर आर्टिस्ट बेपत्ता असल्याची माहितीही समोर येत आहे. 

मुळचा हरियाणा येथील यमुनानगरचा असणाऱ्या या कथित आरोपीने अभिनेत्रीशी मैत्री केली. असं म्हटलं जातं की काही महिन्यांच्या मैत्रीनंतर त्याने तिला हॉटेलवरील एका खोलीत नेलं. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिला अंमली पदार्थ देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चांमुळे हे प्रकरण आता अनेकांचं लक्ष वेधत आहे. 

दरम्यान, अभिनेत्रीने यमुनानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच त्या ज्युनिअर आर्टिस्टने पळ काढला. त्याने आपल्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचं सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार त्या व्यक्तीच्या / कथित आरोपीच्या कुटुंबीयांना हा सारा प्रकार माहित होता आणि त्यांचा त्याला या साऱ्यात पाठिंबाही मिळाला. या साऱ्यामध्ये त्याच्या कुटुंबीयांना झाल्या प्रकाराची माहिती असूनही आपली मदत करण्यास नकार दिल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला. 

काही कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र काम करण्याच्या निमित्ताने अभिनेत्री आणि ज्युनिअर आर्टिस्टची ओळख झाली होती. पुढे ते एकमेकांचे चांगले मित्रही झाले. पण, पुढे गोष्टींना चुकीचं वळण मिळालं आणि आता तो ज्युनिअर आर्टिस्ट फरार आहे. सध्याच्या गडीला याविषयी कोणतीही माहिती उघड करण्यात आली नसली तरीही पोलिसांचा तपास सुरु असल्याचं कळत आहे.