चूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी

'हेच ते मराठीचे मारक मेहता'

Updated: Mar 3, 2020, 08:24 PM IST
चूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी title=
चूक झाली....! तारक मेहता....मधील 'बापू'जींनी मागितली माफी

मुंबई : कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी taarak mehta ka ooltah chashmah 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागामध्ये मराठी भाषेचा अवमान केल्याचं म्हणत सर्वच स्तरांतून मालिकेवर निशाणा साधण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेक़डून या सर्व प्रकरणी 'तारक मेहता....'चा तीव्र शब्दांत विरोध करण्यात आला. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमेय खोपकर यांनी 'हेच ते मराठीचे मारक मेहता', असं लिहित एका ट्विटर पोस्टमधून संताप व्यक्त केला. मालिकेतील एका दृश्यावरुन आणि संवादावरुन होणारा हाच विरोध पाहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं. 

वाचा : 'हिंदी ही मुंबईत बोलली जाणारी भाषा', 'तारक मेहता' मालिका वादात

'हमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है? हिंदी... इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगप हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिळ मे लिखते,' असा संवाद बोलणाऱ्या आणि मालिकेत चंपकलाल गडा म्हणजेच 'बापूजी' हे पात्र साकारणाऱ्या अमित भट्टनेही जाहीर माफी मागितली आहे. 

लिखित स्वरुपातील या माफीनाम्यात आपल्याकडून चूक झाल्याची बाब त्याने स्वीकारली आहे. 'मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. सदर चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माफीही मागतो', असं म्हणत भट्टने आपली बाजू मांडली. 

यापुढे अशी चूक होणार नाही याची व्यक्तीश: दखल घेतली जाईल असा विश्वासही त्याने दिला. मालिकेतील दृश्य आणि भाषेच्या मुद्द्यावरुन झालेली ही चूक पाहता त्यावरुन पेटलेलं वातावरण या माफीनाम्य़ाने शांत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.