मुंबई : मालिका विश्वातून नावारुपास आलेल्या आणि सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे आता अडचणीत आली आहे. आपलं मत व्यक्त करत असतेवेळी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आक्षेपार्ह ओळी लिहिल्याप्रकरणी तिच्याविरोधात ऍट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
नवी मुंबई येथील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणारे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस स्थानकात याप्रकरणी केतकीविरोधात तक्रार दाखल केली. ज्यानंतर तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच केतकीनं फेसबुक या समाज माध्यमावर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये विविध धर्म- पंथांचा उल्लेख तिने केला होता. 'बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातली तर, ते धर्म स्वातंत्र्य' असं लिहित तिने या पोस्टची सुरुवात केली. ज्यामध्ये पुढे 'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो', असंही तिने लिहिलं.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
केतकीने लिहिलेल्या या पोस्टमध्ये नवबौद्धांविषयी लिहिलेल्या वाक्यावर निशाणा साधत, त्यावर आक्षेप घेत जगताप यांनी तिच्याविरोधात हे पाऊल उचललं. देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य करत आपलं मत मांडणाऱ्या केतकीने वापरलेले शब्द पाहता समाजातील काही घटकांनी तिच्याविरोधात सूर आळवला आहे. यापूर्वीही केतकी वादाच्या भोवऱ्याच अडकली होती. त्यामुळे आता या प्रकरणावर केतकी काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.