'तारक मेहता...' फेम दिशा वकानीच्या पतीचा धक्कादायक खुलासा

पती म्हणाला..... 

Updated: Oct 16, 2019, 05:36 PM IST
'तारक मेहता...' फेम दिशा वकानीच्या पतीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानी हिने काही काळापासून या मालिकेतून काढता पाय घेतला होता. गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतरचं मातृत्व या सर्व कारणांमुळे दिशा मालिकेपासून दूर राहिली होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा ती या मालिकेत परतण्याची माहिती समोर येत आहे. 

दोन वर्षांपासून मालिकेपासून दूर असणाऱ्या दिशाचं मालिकेत पुन्हा सहभागी होणं काहीसं लांबताना दिसत आहे. काही गोष्टीं अद्यापही निकाली निघाल्यामुळे दिशाच्या परतीच्या वाटेत काही अडचणी येत आहेत. याचविषयी दिशाच्या पतीने म्हणजे मयुर याने काही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. 

'दिशाने मालिकेसाठीच्या काही भागांचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे पण निर्मात्यांशी सुरु असणारी आमची चर्चा अद्यापही निकाली निघालेली नाही. त्यामुळेच दिशा कार्यक्रमात पूर्णपणे सहभागी होत नाही आहे.  मी अशी आशा करतो की या परिस्थितीवर लवकरच तोडगा निघेल', असं तिचा पती मयुर 'बॉम्बे टाईम्स'शी संवाद साधताना म्हणाला. 

दरम्यान, दिशा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी 'दयाबेन' कार्यक्रमात लवकरच परतणार असल्यामुळे निर्माते असित मोदी यांनाही फार आनंद झाला होता. येत्या काळात ती लवकरात लवकर मालिकेत पूर्णपणे सहभागी होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एकिकडे दिशा नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्येच मालिकेत दणक्यात पुनरागमन करणार असं म्हटलं जात होतं. तर, दुसरीकडे मात्र तिच्या पतीचं वक्तव्य पाहता मालिकेत परतण्याची चिन्हं काहीशी धुसरच दिसत आहेत. 

मालिकेची एकंदर लोकप्रियता आणि 'दयाबेन' या पात्रावर असणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहता, खुद्द दिशा आणि मालिकेचे निर्माते कोणत्या निर्णयावर पोहोचतात याकडेच चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. दिशाच्या परतण्याने सर्वच दृष्टींनी मालिकेला फायदा होणार आहे, शिवाय प्रेक्षकांमध्येही तिच्या येण्याचा आनंद असेल यात शंकाच नाही.