मुंबई : छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये तरुणाईला भावणारं सूत्रसंचालन, गीतलेखन, गायन आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये नशीब आजमावल्यानंतर आयुषमान खुराना याने अभिनय क्षेत्रातही विशेष प्रसिद्धी मिळवली. आयुषमानचा एकंदर वावर, त्याची चित्रपटांची निवड आणि प्रेक्षकांमध्ये असणारी त्याची लोकप्रियता या साऱ्याच्या बळावर त्याने चित्रपट वर्तुळात अतिशय कमी वेळातच आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं.
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये तर, आयुषमान एक अभिनेता म्हणून विविध रुपांमध्ये प्रेक्षकांसमोर आला. मुख्य म्हणजे प्रयोगशीलतेची साथ घेऊन चालणाऱ्या आयुषमानने जितक्या विविध भूमिका साकारल्या त्या प्रत्येतक भूमिकेला प्रेक्षकांकडूनही स्वीकृती मिळाली. 'विकी डोनर', 'ड्रीम गर्ल', 'आर्टीकल १५', 'बधाई हो' अशा अफलातून चित्रपटांच्या बळावर त्याने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतही मजल मारली.
येत्या काळात आयुषमान बाला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, तत्पूर्वी त्याच्याविषयीची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 'बॉलिवूड लाईफ'च्या वृत्तानुसार आयुषमानने त्याच्या वाट्याला येणारं यश पाहता आता त्याच्या मानधनाचा आकडा पाच पटींनी वाढवला आहे.
असं म्हटलं जातं की, आतापर्यंत आयुषमान त्याच्या चित्रपटांसाठी २ कोटी रुपये इतकं मानधन घेत होता. ज्यामध्ये आता वाढ करत प्रत्येक प्रोजेक्टसाठी यापुढे तो तब्बल १० कोटी रुपये इतकं मानधन घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, सध्याच्या घडीला त्याच्या मानधनात करण्यात आलेली ही कथिच वाढ अनेकांना धक्का देत आहे हे खरं.