... या अभिनेत्याची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकेची खाती सील

२००७-०८ मध्ये विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आणि ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून महेश बाबू यांनी जी कामे केली. त्याचा सेवा कर त्यांनी अद्याप भरलेला नाही.

Updated: Dec 28, 2018, 10:47 AM IST
... या अभिनेत्याची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकेची खाती सील title=

मुंबई - सेवाकराची थकीत रक्कम न दिल्यामुळे तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश बाबू यांची खासगी बॅंकांतील दोन खाती वस्तू व सेवा कर विभागाने सील केली आहेत. महेश बाबू यांची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकांत असणारी खाती विभागाने सील केली आहेत. त्यामुळे त्यांना तूर्त या खात्यांच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करता येणार नाही. हैदराबादमधील वस्तू व सेवा कर विभागाच्या आयुक्तालयाने या संदर्भात एक पत्रक जारी केले आहे. 

२००७-०८ मध्ये विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आणि ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून महेश बाबू यांनी जी कामे केली. त्याचा सेवा कर त्यांनी अद्याप भरलेला नाही. त्यांच्याकडे सध्या १८.५ लाखांचा सेवाकर प्रलंबित आहे. त्यामुळे विभागाने त्यांची ऍक्सिस आणि आयसीआयसीआय बॅंकेतील खाती सील केली आहेत. सेवाकराची मूळ प्रलंबित रक्कम आणि व्याज तसेच दंड मिळून एकूण ७३.५ लाख रुपये महेश बाबू यांच्याकडे प्रलंबित आहेत. ते सर्व वसूल करण्यासाठी त्यांची बॅंक खाती सील करण्यात आली आहे, असे आयुक्तालयाच्या पत्रकात म्हटले आहे. 

महेश बाबू यांना या सेवाकरासंदर्भात कोणताही दिलासा देण्यास कर लवादाने नकार दिला आहे. त्यामुळेच आम्ही त्यांची बॅंक खाती सील केली, असे आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. महेश बाबू यांच्याकडून वसुली करण्यासाठीच आम्ही ही कारवाई केली. आतापर्यंत ऍक्सिस बॅंकेतील त्यांच्या खात्यातून ४२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम आयसीआयसीआय बॅंकेतून वसुल करण्यात येईल. जर उर्वरित रक्कम आयसीआयसीआय बॅंकेतून मिळाली नाही तर वित्त पुरवठा कायदा १९९४ नुसार बॅंकेवर कारवाई करण्यात येईल. जोपर्यंत सर्व कर रक्कम वसुल होत नाही, तोपर्यंत महेश बाबू या बॅंक खात्यातून व्यवहार करू शकणार नाहीत.