जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन घडवणारा 'तेरवं 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

८ मार्चला  जगभरात अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. याचनिमीत्ताने 'तेरवं' हा सिनेमा येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेरवं हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगते. 

Updated: Feb 7, 2024, 04:27 PM IST
जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन घडवणारा 'तेरवं 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : जगभरात ८ मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस खासकरुन महिलांच्या समस्यांना समर्पित केला जातो. दरवर्षी या दिवसाची काही ना काही विशेष थीम असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली. दरवर्षी ८ मार्चला हा दिवस साजरा केला जातो. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो की, ८ मार्च महिला दिनी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'तेरवं' असं या सिनेमाचं नाव असून येत्या ८ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा पुढारलेला नाही. त्यामुळे एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा "तेरवं" हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर येत आहे. हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठकसह अनेक कसलेले कलाकार दिसणार आहेत. 

तेरवं या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नरेंद्र जिचकार यांच्या अंजनीकृपा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे तेरवं चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नरेंद्र राहुरीकर सहनिर्माता आहेत. श्याम पेठकर यांनी तेरवं चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर सुरेश देशमाने यांनी छायांकन, वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेठकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. 

तेरवं हा चित्रपट जनाबाई या स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगतो. कौटुंबिक ते सामाजिक आव्हानं येऊनही खंबीरपणे त्याला कस  सामोरं जात वेगळं काम निर्माण करणाऱ्या जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा महिला दिन नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही.

का साजरा केला जातो महिला दिन
न्यूयॉर्कमध्ये 1908 साली एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा महिला दिन साजरा करण्यात खारीचा वाटा आहे. या रॅलीमध्ये 12 ते 15 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. ही रॅली न्यूयॉर्कमध्ये काढण्यात आली होती. या रॅलीत महिलांची कामाची वेळ कमी करावी यासाठी मागणी करण्यात आली होती. याचबरोबर प्रत्येक महिलेला त्यांच्या कामानुसार पगार मिळावा यासाठी मागणी होत होती. यासोबतच प्रत्येक महिलेला मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी होत होती. या रॅलीच्या बरोबर एक वर्षानंतर हा दिवस अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिला राष्ट्रीय महिला दिन जाहीर केला. यानंतर डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी येथे  1911 मध्ये  देखील पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. यानंतर 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे महिला दिनाला मान्यता दिली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी एका खास थीमसह साजरा केला जातो.