मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. देशात एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत होणारी वाढ राज्याची, मुंबईची चिंता वाढवणारी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रार्थनारुपी गाण्यातून वंदन करण्यात आलं आहे. अभिनेते आणि सिद्धीविनायक संस्थानचे प्रमुख आदेश बांदेकर यांनी अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आज संपूर्ण विश्वावर जे संकट आलं आहे ते दूर व्हावं, पुन्हा एकदा आनंदाने जगता यावं, मनमोकळा श्वास घेता यावा यासाठी आज मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा ही धार्मिक स्थळं बंद आहेत. कारण देव प्रत्यक्षात डॉक्टर, पोलिस, नर्स, सफाई कामगार, शेतकरी यांच्या रुपात आपली रक्षा करत आहेत, या सर्वांना आम्ही वंदन करतो आणि ही प्रार्थना बाप्पाच्या चरणी अर्पण करतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा ही सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत. पण देव डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांच्या रुपात संपूर्ण जनतेची रक्षा करत आहे. संपूर्ण मुंबई, राज्य, आपला देश लवकरात लवकर कोरोनातून मुक्त होण्यासाठी 'वंदन तुजला हे गजवदना' या प्रार्थनेद्वारे सिद्धीविनायकाच्या चरणी साकडं घालण्यात आलं आहे.