मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही व मक्तेदारीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. सध्या अभिनेत्री कंगना रानौत वारंवार या वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत तिने कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती सोशल मिडियाच्या माध्यमातून वारंवार सांगत आहे.
कंगनाच्या या वादग्रस्त भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. मात्र अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी कंगना विषयी आपलं मत मांडलं आहे.
ते म्हणाले, 'अनेक अडचणींचा सामना करत कंगनाने बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. आता देखील ती फार चांगलं काम करत आहे. असंख्य लोक कंगनाच्या विरूद्ध बोलतात, किंबहूना ते कंगनाचा विरोध देखील करतात.' असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शिवाय बॉलिवूडमध्ये कोणाच्याही आशीर्वादाशिवाय या मुलीने खूप यश संपादन केलंय. तिचं हे यश पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे. असं म्हणत त्यांनी कंगनाचं कौतुक देखील केलं.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खानवर सडकून टीका केली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झाली. याचा सर्वात मोठा फटका अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरूण धवनला बसला आहे.