मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील सुशांत आपल्यातचं आहे अशी भावना त्यांच्या चाहत्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मनात कायम आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या त्याच्या चाहत्यांना 'दिल बेचारा' चित्रपटाच्या माध्यमातून ती संधी मिळाली. २४ जुलै रोजी सुशांतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचारा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चाहत्यांनी देखील त्यांच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
याच पार्श्वभूमीवर सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट केली. अंकिताने इंन्स्टाग्रामवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
'पवित्र रिश्ता मालिकेपासून ते दिल बेचारा चित्रपटापर्यंत... एकदा शेवटचं...' चित्रपटाच्या पोस्टरला असं भावूक कॅप्शन देत तिने सुशांतसोबत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. जवळपास सहा वर्षांसाठी अंकिता आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते.
सुशांतने १४ जुलैरोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या निधनानं सर्वाधिक धक्का त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना बसला आहे. अद्यापही त्यांचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.