मुंबई : 'Torbaaz' सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 2022 ची होळी त्यांना अवस्मरणीय दु:ख देवून गेली. जे त्यांच्या मनातून कधीच दूर होऊ शकणार नाही. मुंबईतील अंधेरी येथील घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून गिरीश मलिक यांचा १७ वर्षीय मुलगा मनन याचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर कुटुंबीयांनी मननला तातडीने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केलं. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. होळीच्या दिवशी मननसोबत हा अपघात झाला की त्याने स्वतः इमारतीवरून उडी मारली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
गिरीश मलिक यांच्या 17 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर घरात शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांना धक्का बसला आहे. एका वृत्तानुसार, ज्या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे अंधेरी वेस्ट येथील ओबेरॉय स्प्रिंग्स. मनन ईथे ए-विंगमध्ये राहत होता.
संध्याकाळी 5 वाजता घडली घटना
रिपोर्टनुसार, मनन दुपारी होळी खेळायला गेला होता आणि काही वेळाने तो घरी परतला. घरी परतल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच मननला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याला वाचवण्यात यश नाही आलं आणि त्याचा मृत्यू झाला.
गिरीश मलिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत
गिरीशने बॉलिवूडला ''Torbaaz'' आणि 'जल' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ''Torbaaz'' हा चित्रपट 2020 मध्ये आला होता. ज्यामध्ये संजय दत्त, राहुल देव आणि नर्गिस फाखरी महत्त्वाच्या भूमिकेत होते.