रिएलिटी शोमध्ये लहान मुलांना साजेसं नृत्य द्या; केंद्र सरकारचे निर्देश

...म्हणून उचललं हे पाऊल

Updated: Jun 25, 2019, 09:26 AM IST
रिएलिटी शोमध्ये लहान मुलांना साजेसं नृत्य द्या; केंद्र सरकारचे निर्देश

मुंबई : लहान मुलांचा सहभाग असलेल्या रिएलिटी शोंमध्ये यापुढे आयोजकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने वाहिन्यांना याबाबतचे खास निर्देश दिले आहेत. लहान मुलांना त्यांच्या वयाला साजेसं नृत्य करू द्यावं. लहान वयाला न शोभणाऱ्या नृत्याच्या स्टेप्स, चुकीच्या पद्धतीचे हावभाव यामुळे लहान मुलांमधील निरागसता हरवत चालल्याचा काहींचा आक्षेप आहे.

लहान मुलांवर याचे विपरित परिणाम होत असल्याचं सांगत अशा प्रकारची सूचना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे रिअ‍ॅलिटी शोमध्ये लहान मुलांचा सहभाग असल्यास मुलांच्या पालकांना आणि वाहिन्यांनाही खास काळजी घ्यावी लागणार आहे.

पुस्तकी ज्ञान हे जगात कसं वावरावं हे शिकवतं, पण कला आपल्याला जगायला शिकवतं. प्रत्येक ठिकाणी कलेला नेहमीच अव्वल स्थान असते. पण या स्पर्धेच्या युगात लहान मुलांचं बालपण हरवताना दिसत आहे. अभ्यासा व्यतीरिक्त इतर कला ही मुलांच्या अंगात असावी असा प्रत्येक पालकाचा अट्टहास असतो. 

सध्या नृत्य कलेला अनन्यसाधारण महत्व लाभत आहे. पण लहान मुलांना गाण्याच्या बोलामागचे अर्थ स्पष्ट होत नसतात, त्यामुळे असे डान्स स्टेप लहान मुलांच्या वयाला साजेसे नसतात हा मुद्दा यातून अधोरेखित करण्यात आला आहे.