तुझ्यात जीव रंगला मधील सुरज हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. सुरज म्हणजे अभिनेता राज हंचनाळे चला हवा येऊ द्या शेलिब्रिटी पॅटर्न या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्यांना खळखळून हसवत आहे. त्याच्या या वेगळ्या भूमिकेबद्दल राज सोबत साधलेला हा खास संवाद...
१. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सुरजची व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे, पण आता चला हवा येऊ द्या मध्ये कॉमेडी करताना पाहून तुला प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या?
- मला खूप चांगल्या आणि पॉझिटिव्ह प्रतिकिया मिळत आहेत. चला हवा येऊ द्या मधील माझ्या पहिल्याच स्किटला गोल्डन हापूस मिळाला. त्यानंतर माझा या कार्यक्रमातील प्रवास सर्व प्रेक्षक बघत आहेत. आजचा प्रेक्षक वर्ग हा सुजाण आहे आणि सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय देखील आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेव्हा मला अशा प्रतिक्रिया येतात कि माझं कॉमेडीचा टायमिंग चांगलं आहे, माझी पर्सनॅलिटी आवडतेय, या सगळ्यामुळे मला एक वेगळीच एनर्जी मिळते.
२. कॉमेडी करणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?
- याआधी मी कधीच विनोदी अभिनय केला नव्हता त्यामुळे कॉमेडी करणं हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. लोकांना हसवणं हे खूप अवघड काम आहे. पण हे टीम वर्क आहे आणि जरी कॉमेडी करणं माझ्यासाठी आव्हानात्मक असाल तरी मी या मंचावर रोज खूप काही नवीन शिकतोय.
३. तू 'साताऱ्याचे शिलेदार' या सागरच्या टीमचा सदस्य आहेस, कॉमेडीचे धडे गिरवण्यासाठी सागरची कितपत मदत होते?
- सागर दादाचा प्रेझेन्सच खूप एनर्जी देऊन जातो. तो नेहमी हसतमुख असतो आणि त्याला काहीही विचारलं तरी तो मदत करतो. माझ्या मते सागर दादा हा एक हलवा कॉमेडियन आहे. तो स्टेजवर तर धमाका करतोच पण जेव्हा पत्र वाचतो तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे त्याच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
४. स्टेज परफॉर्मन्सची भीती वाटते का?
- भीती नाही पण मी नर्वस होतो, जे गरजेचं देखील आहे. कारण स्टेजवर जाण्याआधी सगळ्यांच्या पोटात गोळा येतो आणि तसं होऊ नये म्हणून आपण खूप सराव करून ती नर्वसनेस घालवून अधिक एनर्जीने परफॉर्म करतो.
५. थुकरटवाडीतील तुझा फेव्हरेट विनोदवीर कोण आणि का?
- सगळेच कमाल आहेत पण सगळ्यात जास्त मला निलेश साबळे आवडतात. ते अतिशय शांत स्वभावाचे आहेत. त्यांना कुठल्याही वेळी काहीही विचारलं तरी ते मार्गदर्शन करतात. तुम्ही त्यांच्याबरोबर स्किट बद्दल बोलू शकता, चर्चा करू शकता. त्यांच्या इन्पुट्सने स्किट अजून उत्तम बनतं, त्यांच्याकडे ती जादूच आहे कदाचित.
६. आता तू टॉप १० मध्ये सहभागी झाला आहेस, शेलिब्रिटी पॅटर्नमध्ये तुला टक्कर देणारा कलाकार कोण वाटतो?
- मी स्किट मध्ये सगळ्यांसोबत अजून काम केलं नाही आहे. पण मी अद्वैत दादरकर यांचा खूप मोठा चाहता आहे कारण मी त्यांचं काम खूप आधीपासून पाहिलं आहे. टक्कर देणारा कलाकार म्हणाल तर सगळेच खूप तोडीचे आहेत इकडे आणि स्पर्धा म्हणाल तर मी स्वतःशीच स्पर्धा करतोय. कारण माझ्यासाठी हा जॉनर नवीन आहे. माझ्या आधीच्या स्किटपेक्षा पुढील स्किट किती जास्त चांगलं करता येईल याकडे माझा जास्त लक्ष असतं. चला हवा येऊ द्या मंच खूप मोठा आहे आणि इथून मी सगळ्यांकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतोय.