Sheezan Khan on Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने 2022 मध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अभिनेता शिझान खान हा सातत्याने चर्चेत होता. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शिझानवर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो दोन महिने तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तुनिषाच्या आत्महत्येला एक वर्ष उलटल्यानंतर अखेर शिझान खानने तिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
शिझान खान हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच शिझानने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतले होते. त्यावेळी त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिली. यादरम्यान एका चाहत्याने त्याला तुनिषाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने भाष्य केले.
"तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूला गेल्या डिसेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. तसेच 4 जानेवारीला तिचा वाढदिवस होता. मात्र या दोन्हीही दिवशी तू एकही पोस्ट का केली नाही", असा प्रश्न शिझान खानला एका चाहत्याने विचारला आहे. त्यावर शिझान खानने उत्तर दिले आहे.
"मी या दोन्हीही दिवशी काहीही पोस्ट केले नाही, कारण कोर्टात दुसऱ्या पक्षाने माझी एका कागदावर सही घेतली आहे. या कागदावर असे नमूद करण्यात आले होते की, मी तिचा कोणताही फोटो अपलोड करु शकत नाही. तसेच तिचे नावही सार्वजनिकरित्या घेऊ शकत नाही. तसेच आता हे शेवटचं असेल, यापुढे भविष्यात मी कधीही याबद्दल चर्चा करणार नाही", असे शिझान खानने म्हटले आहे.
दरम्यान तुनिषा शर्मा आणि शिझान खान हे दोघेही 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेतील शूटींगदरम्यान ते रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणांनी त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर तुनिषाने सेटवरच गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांना धक्का बसला होता. तुनिषाला मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान खानला 70 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. शिझान खानला 24 डिसेंबरला अटक करण्यात आले होते. त्याची 5 मार्च 2023 रोजी जामीनावर सुटका करण्यात आली होती.