माझ्या नवऱ्याची बायको : पाहायला मिळणार एक नवं वळण !!

'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 03:03 PM IST
माझ्या नवऱ्याची बायको : पाहायला मिळणार एक नवं वळण !!

मुंबई : 'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय.

आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय

एक धमाल वळण!

गुरुनाथला राधिकापासून सुटका हवी आहे आणि राधिकाला कोणत्याही परिस्थितीत गुरुनाथला शनायापासून सोडवायचं आहे. गुरुनाथला मात्र या दोघींचं कोडं सोडवायचं आहे. मागे शनायाने थेट गुरुनाथकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत वारंवार अडकणाऱ्या गुरुनाथच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झाली. मसाल्यांचा गृहउद्योग स्थापन करून व्यावसायिक जगात आपली अशी वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या राधिकाने आता कात टाकली आहे. इतके दिवस साधी सरळ गृहिणी म्हणून वावरणारी राधिका आता स्वतःच व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करणार आहे. सहावारी साडीसोबतच आता आकर्षक पंजाबी ड्रेसमध्ये राधिका आपल्याला दिसणार आहे.

तर तिकडे, गुरुनाथला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी शनायाने चक्क राधिकाचं सोंग घेतलं आहे. एरव्ही मॉर्डन कपड्यात वावरणारी शनाया आता आपल्याला चक्क साडीमध्ये दिसणार आहे. राधिकासारखं नम्र, प्रेमळ, आज्ञाधारक होण्याचं शनायाने ठरवलं आहे. 'पती परमेश्वर' मानून गुरुनाथच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्याचं तिने ठरवलं आहे. दोघींमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाचं कौतुक करण्याऐवजी गुरुनाथ मात्र धास्तावला आहे. 

प्रेमळ राधिकाची हुशारी, अलबेली शनायाचा खोडसाळपणा आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची हतबलता या त्रयीच्या स्वभाव वैशिष्टयांनी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. नुकताच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पार केला. 'माझ्या नवऱ्याची बायको'च्या सेटवर संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद व्यक्त केला. दिवसेंदिवस रंजक होत जाणाऱ्या या मालिकेमध्ये आता प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. आता दोघींमध्ये होणारा हा बदल गुरुनाथसाठी कोणत्या नव्या संकटाची नांदी ठरेल? शनायाला राधिकासारखं वागणं जमेल का? राधिकाचं खुललेलं व्यक्तिमत्व तिच्या गृहउद्योगात कसं उपयोगास येईल? या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं मिळतील मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये, तेव्हा पाहायला विसरू नका  'माझ्या नवऱ्याची बायको' सोम-शनि रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!