Ram Charan and Upasana Kamineni : पती- पत्नीच्या नात्याची एक संपूर्ण वेगळी बाजू तेव्हाच पाहायला मिळते जेव्हा त्यांच्या नात्यात एक नवा आणि चिमुकला पाहुणा किंवा पाहुणी येते. अर्थात त्यांच्या बाळाचा जन्म होतो. खऱ्या अर्थानं हे नातं नव्यानं आकारास येतं. आयुष्याच्या या टप्प्यावर सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे एकमेकांची साथ. अशा या हव्याहव्याशा आणि खुप काही शिकवणाऱ्या वळणावर सध्या दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी पोहोचले आहेत.
लग्नानंतर जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर राम चरण आणि उपासना आई-बाबा झाले. नुकताच उपासनानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि या दोघांच्याही आयुष्याला कलाटणी मिळाली. या चिमुकलीच्या जन्मानंतर South Superstar चिरंजीवी यांच्या कुटुंबावर सध्या सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यातच एक चर्चा रंगतेय ती म्हणजे उपासना आणि राम चरणच्या नात्याची.
उपासना आणि राम या दोघांचंही नातं हेवा वाटावं इतकं सुंदर. त्याच्या कारकिर्दीतील यशाची पारख करण्यापासून त्याचा पडता काळ सावरून नेण्यापर्यंत प्रत्येक वेळी उपासनानं मोठ्या धीरानं परिस्थिती सांभाळली. थोडक्यात राम चरणसाठी ती हक्काचा आधार ठरली.
फक्त भावनिक नात्यातच नव्हे, तर वस्तुस्थिती समजून घेत उपासनानं स्वत:चीही वेगळी ओळख निर्माण केली. जाणून आश्चर्य वाटेल पण उपासना आणि राम चरण या दोघांच्या नावे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीची नोंद आहे. तर, उपासना एक यशस्वी उद्योजिका असून, तिची संपत्ती 1130 कोटी रुपये इतकी आहे. राम चरण याच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे, 1,370 कोटी रुपये.
व्यवसाय आणि उपासनाचं फार जुनं नातं असून, या क्षेत्रात तिच्या कुटुंबाची बरीच चर्चा पाहायला मिळते. उपासनाच्या आईचे वडील, Pratap C. Reddy हेसुद्धा एक नामांकित व्यावसायिक आणि अपोलो रुग्णालयांचे संचालक आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा 21000 कोटी रुपये इतका असून, देशातील 100 अब्जोधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश होतो. अपोलो रुग्णालयांचा market cap हा तब्बल 70 हजार कोटी रुपये इतका असून, उपासना ही या समुहाची उपाध्यक्षा आहे. तर, तिची आई शोभना vice-chairperson आहे. थोडक्यात राम चरणला संपत्तीच्या बाबतीतल उपासना टक्कर देतेय खरी, पण या नात्यात मात्र हिशोबाची शर्यत अजिबातच नाही.