मुंबई : अवयवदान या विषयावर आधारित 'विकून टाक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब म्हणजे अवयवदानावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी एका ३३ वर्षीय नेत्रहीन व्यक्तीने गाणं गायलं आहे. या गाण्याचे बोलही डोळ्यांसंबंधीच आहेत.
'विकून टाक' चित्रपटासाठी नेत्रहीन डॉ. दिव्या बिजूर यांनी 'डोळ्यांमंदी तुझा चांदवा' हे प्रेमगीत गायलं आहे. अमितराजने 'डोळ्यांमंदी तुझा चांदवा' गाण्याला संगीत दिलं आहे.
अवयवदान हे किती महत्त्वाचं आहे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला चांगल्या पद्धतीने कळू शकेल? 'विकून टाक' हा चित्रपट नेमक्या याच विषयावर अतिशय तरल भाष्य करतो. त्यामुळे या चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळणं ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं डॉ. दिव्या यांनी सांगितलं.
डॉ. दिव्या बिजूर या जन्मापासूनच दृष्टीहीन आहेत. ऑप्टिक नर्व्ह कंडिशनमुळे दिसू शकत नसल्याचं दिव्या यांनी सांगितलं. त्या फिजिओथेरपी डॉक्टर आहेत. डॉ. दिव्या यांच्या घरातील सर्वच जण डॉक्टर आहेत. त्यांचे वडील रविंद्र बिजूर नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आई डॉ. सुजल बिजूर या अनेस्थेसिस्ट आहेत. तर मोठी बहीण प्रसुतीशास्त्रातील तज्ज्ञ आहेत.
'विकून टाक' चित्रपटाच्या गाण्यासाठी डॉ. दिव्या यांचा आवाज योग्य वाटला आणि आम्ही त्यांना गाण्यासाठी विनंती केली. त्यांनीही गाणं गाण्यासाठी होकार दिला. लोकांना हे गाणं आवडलं, तर चित्रपटाद्वारे जो संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत, तो अधिक परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल अशी प्रतिक्रिया निर्माते उत्तुंग ठाकूर यांनी दिली.
अवयव दान या एका विषयावर आधारित 'विकून टाक' चित्रपटात अत्यंत खेळकरपणे याबाबतची गंभीरता मांडण्यात आली आहे. उत्तुंग ठाकूर निर्मित 'विकून टाक' हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.