Sulochana Latkar Death: डोळ्यात तेज, गोरापान चेहरा अन् बहारदार अभिनय. गेली 70 वर्षे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी कांचन घाणेकर आणि परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आज संध्याकाळी 6 वाजता त्यांचे वृद्धापकाळानं निधन झालं आहे. सुलोचना दीदींनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या भुमिका निभावल्या आहेत. 'मराठी तितुका मेळवावा' या चित्रपटातून त्यांनी जिजाऊ यांची भुमिका केली होती, जी प्रचंड गाजली होती.
सुलोचना दीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. त्यांना सुश्रुषा रूग्णालयात काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्माशनभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुलोचना दीदींचं मूळ नाव हे सुलोचना लाटकर असे होते. कोल्हापूरमधल्या खडवलट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. त्यांनी जेव्हा अभिनयक्षेत्रात यायचे ठरवले तेव्हा त्यांना दिग्दर्शक आणि त्यांचे गुरू भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांनी 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तंबूतल्या चित्रपटानं सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण झाली.
'जय भवानी' या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या. 'मराठा तितुका मेळवावा' या सिनेमातल्या जिजाऊंच्या भूमिकेमुळं सुलोचना दीदींचं वेगळं रूप समोर आलं. त्याशिवाय 'वहिनीच्या बांगड्या',' भाऊबीज', 'बाळा जोजो रे', 'चिमणी पाखरं', 'प्रपंच', 'स्त्री जन्मा तुझी ही कहाणी', 'पारिजातक' हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट होते. 'मोलकरीण' आणि 'एकटी' या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका प्रचंड गाजली.
मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला आहे. बिमल रॉय यांच्या 'सुजाता' चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. हिंदी चित्रपटांमध्ये त्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर या आघाडीच्या नायकांच्या त्या आई झाल्या. सुलोचना दीदींना 'पद्मश्री', 'महाराष्ट्र भूषण', 'झी जीवन गौरव पुरस्कार' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. एकाच वेळी खानदानी तेज, करारीपणा, घरेलू साधेपणा, आणि पराकोटीची सोशिकता आपल्या अभिनयातून दाखवल्यामुळे त्यांचं वेगळेपण वेळोवेळी दिसून आलं. आज सुलोचना दीदी आपल्यात नाहीत यामुळे मराठी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.