Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं 78 व्या वर्षी निधन

Actor Ravindra Berde passed away: ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. रविंद्र यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 13, 2023, 07:19 AM IST
Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं 78 व्या वर्षी निधन title=

Actor Ravindra Berde passed away: ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. रविंद्र यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीत रविंद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकेने वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या काही काळापासून ते घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावेळी उपचार सुरु असताना त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ

रविंद्र बेर्डे यांची अजून एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली होती. 

कर्करोगाशी झुंज देत होते रविंद्र

रवींद्र बेर्डे यांना घशाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यावेळी उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

धमाल बाबल्या गणप्याची, चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.