Tabassum Govil Death: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन

Tabassum Govil Death: बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या Tabassum यांचा 'फूल खिले है गुलशन गुलशन' हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रचंड गाजला, या कार्यक्रमाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली  

Updated: Nov 19, 2022, 07:44 PM IST
Tabassum Govil Death: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन title=

Tabassum Govil Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम (Tabassum) यांचं निधन झालंय. त्या 78 वर्षांच्या होत्या. तबस्सुम यांना कार्डियक अरेस्ट आला, यातच त्यांचं निधन झालं. एप्रिल 2021 मध्ये तबस्सूम गोविल यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. यानंतर तबस्सूम यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे खोट वृत्त असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

बेबी तबस्सूम नावाने प्रसिद्ध
1947 साली तबस्सूम यांनी बेबी तबस्सूम नावाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तबस्सुम यांनी लहानपणीच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्या जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर आल्या तेव्हा त्या अवघ्या 3 वर्षांच्या होत्या. 'मेरा सुहाग' हा सिनेमा 1947 साली रिलीज झाला. तबस्सुम यांनी या सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच तबस्सुम यांनी 'दीदार' सिनेमात नरगिस यांच्या लहाणपणीची भूमिका केली होती. यामुळे त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान यानंतर त्यांनी अनेक सिनेमे केले.

1947 साली सिनेसृष्टीत पदार्पण 
तबस्सूम यांनी सुहाग, मंझधार, बडी बहन आणि दीदार यासारख्या चित्रपटात काम केलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं 'बचपन के दिन भूला ना देना' हे गाणं बेबी तबस्सूम यांच्यावरच चित्रीत करण्यात आलं होतं. बैजू बावरा या सिनेमात तबस्सूम यांनी मीना कुमारी यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.

यानंतर तबस्सूम यांनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. मोठं झाल्यावर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. भारतीय टेलेव्हिजनवरचा पहिला टॉक शो 'फूल खिले है गुलशन गुलशन'चं सूत्रसंचलन केलं. या कार्यक्रम तब्बल 21 वर्ष (1972 ते 1993 तक) चालला. या कार्यक्रमात तबस्सूम यांनी अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमामुळे तब्बस्सूम यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. 

दिग्दर्शन आणि लेखक म्हणून कारकिर्द
1985 मध्ये तबस्सूम यांनी दिग्ददर्शक, निर्माती आणि लेखक म्हणून आपला पहिला सिनेमा प्रदर्शित केला. या सिनेमाचं नाव होतं 'तुम पर हम कुर्बान'. 2006 मध्ये त्यांनी पुन्हा टीव्ही कार्यक्रमात पुनरागमन केलं. तबस्सूम यांनी रामायण मालिकेतील अभिनेते अरुण गोविल यांचे मोठे भाऊ विजय गोविल यांची लग्न केलं. तबस्सूम यांना एक मुलगा असून त्यांचं नाव होशांग गोविल आहे.