ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन

आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयामुळे राजा मयेकर यांना लोकनाट्याचा राजा म्हणून संबोधले जाई.

Updated: Feb 15, 2020, 04:30 PM IST
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन title=

मुंबई: आपल्या कसदार अभिनयाने तब्बल ६० वर्षे रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

आज सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयामुळे राजा मयेकर यांना लोकनाट्याचा राजा म्हणून संबोधले जाई. सुरुवातीच्या काळात त्यांनी दशावतारी नाटकांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवली. यानंतर नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या माध्यमांमध्ये त्यांनी स्वच्छंदपणे मुशाफिरी केली.

'आंधळं दळतंय', 'यमराज्यात एक रात्र' , 'असूनी खास घरचा मालक', 'बापाचा बाप', 'नशीब फुटकं सांधून घ्या', 'कोयना स्वयंवर' या लोकनाट्यांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय, दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

व्यवसायिक रंगभूमीवरही राजा मयेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'गुंतता हृदय हे', 'सूर राहू दे' ,'गहिरे रंग', 'श्यामची आई', 'धांदलीत धांदल', 'भावबंधन', 'एकच प्याला', 'संशयकल्लोळ', 'बेबंदशाही', 'झुंझारराव' या व्यवसायिक नाटकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.