बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या कौटुंबिक चित्रपटाचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यात सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) चित्रपटाचा उल्लेख केला जातो. या चित्रपटाला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील गाणी आजही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजत असतात, तसंच लोक गुणगुणत असतात. सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये याचा आवर्जून उल्लेख होतो. दरम्यान या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान सीन संपताच माधुरी सलमानचा हात झटकताना दिसत आहे.
सलमान खान आणि माधुरी दीक्षित 'धिक ताना' गाण्याचं शुटिंग करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी ते हातात हात घालून नाचत असल्याचं दिसत आहे. तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर या गाण्यात सलमान खानला समोर माधुरी असल्याचा भास होत असतो. दरम्यान या गाण्यातील एका शॉटमध्ये सलमान आणि माधुरीला हातात हात घालून नाचायचं असतं. हा शॉट संपताच तेथून जाताना माधुरी रागात सलमानचा हात झटकताना दिसत आहे.
दरम्यान पुढे सातत्य राखण्यासाठी सलमान खान तसाच उभा असतो. यानंतर चित्रपटात नोकराच्या भूमिकेत असणारे लक्ष्मीकांत बेर्डे माधुरीची जागा घेतात आणि पुढील शॉट सुरु होतो. यानंतर माधुरीच्या जागी लक्ष्मीकांत बेर्डेंना पाहून सलमान खान आश्चर्यचकित होतो असा शॉट आहे.
हा जुना व्हिडीओ सध्या नव्याने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, 'शेवटी माधुरी इतकी रागात जाताना का दिसली?'. एकाने मी हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी जात आहे असं म्हटलं आहे. तसंच एका युजरने एका सीनसाठी किती मेहनत घ्यावी लागते अशी कमेंट केली आहे. सलमान खानच्या एका चाहत्याने त्याचं कौतुक केलं आहे.
5 ऑगस्ट 1995 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजश्री प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.