मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपल्या सुरेख अभिनयाच्या आणि तितक्याच मोहक रुपाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. सीमा देव यांचा मुलगा, अभिनेता अजिंक्य देव यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
आपली आई सध्या अल्झायमरच्या आजारानं ग्रासली गेली आहे. ती या आजाराशी झुंज देत आहे, असं लिहित आपलं संपूर्ण कुटुंब तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. शिवाय महाराष्ट्रातील तमाम चाहत्या वर्गालासुद्धा आपल्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.
सीमा देव यांच्या प्रकृतीबाबतचं हे वृत्त कळताच चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याप्रती चिंता व्यक्त केली. तर, अनेकांनीच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही केल्याचं पाहायला मिळालं.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या सीमा देव यांची लोकप्रियता आजही कायम आहे. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावर जितकी प्रेक्षकांच्या आवडीची तितकंच खऱ्या आयुष्यातही त्यांनी खऱ्या अर्थानं सहजीवनाचा आदर्शच सर्वांपुढं ठेवल्याचं पाहायला मिळालं. एव्हरग्रीन सेलिब्रिटी जोडी म्हणूनही या दोन्ही कलाकारांकडं पाहिलं जातं.
सीमा देव यांच्या अभिनयाबाबत सांगावं तर, त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये तितक्याच लोकप्रिय आहेत. 'आऩंद', 'जगाच्या पाठीवर', 'सुवासिनी' अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. कलाविश्वात असं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या अभिनेत्रीला लवकरात लवकर बरं वाटावं हीच प्रार्थना अनेकांनी केली आहे.