रानू मंडल यांच्याविषयी लतादीदी म्हणतात, नक्कल करुन....

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या... 

Updated: Sep 4, 2019, 01:54 PM IST
रानू मंडल यांच्याविषयी लतादीदी म्हणतात, नक्कल करुन....  title=

मुंबई : पश्चिम बंगाल येथील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन आयुष्याचा प्रत्येक दिवस लोटणाऱ्या रानू मंडल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला. पाहता पाहता त्यांचा आवाज हा साऱ्या देशात पोहोचला. प्रत्येकाने रानू यांच्या आवाजाची प्रशंसा केली. इतकच नव्हे, तर त्यांच्यासाठी कलाविश्वातून मदतीचा हातही पुढे करण्यात आला. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या या रानू मंडल यांच्याविषयी आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कोणाचं आयुष्य मार्गी लागत असेल, कोणाला मदत होत असेल तर यात मी माझं भाग्यंच समजते. पण, मला असं वाटतं की, कोणाचीही नक्कल करुन तुम्ही फार काळासाठी यशस्वी ठरु शकत नाही. बरेच नवोदित गायक, गायिका या दिग्गजांची गाणी म्हणतात. किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांचीही गाणी ते म्हणतात. पण, त्यामुळे त्यांना मिळणारी प्रसिद्धी ही फार कमी काळ टीकणारी असते. ते यश फार काळ टीकत नाही', असं त्या म्हणाल्या. 

'आयएएनएस'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रानू मंडल यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांविषयी त्यांनी चिंतेचा सूर आळवला. पहिलंवहिलं यश मिळाल्यानंतर किती मुलांना कायमस्वरुपी लक्षात ठेवलं जातं, असा प्रश्न उपस्थित करत सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल यांचीच नावं माझ्या लक्षात आहेत, असंही लतादीदी म्हणाल्या. नवोदित गायकांनी स्वत:चा खराखुरा आवाज जपण्याचाही सल्ला दिला. स्वत:ची अशी एक वेगळी शैली आकारास आणण्याची बाबही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.