AR Rahman Viral Video: दक्षिणेकडील राज्यांचं त्यांच्या मातृभाषेवरील प्रेम किती कट्टर आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. जेव्हा कधी भाषेचा प्रश्न येतो तेव्हा दाक्षिणात्य राज्यं नेहमीच आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात. सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांचं हे भाषाप्रेम वाखाणण्याजोगं आहे. दक्षिणेकडील अभिनेते, सेलिब्रिटीही आपलं हे भाषाप्रेम जाहीरपणे व्यक्त करत असतात. यामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान (AR Rahman) याचाही समावेश आहे. त्याचं आपल्या तामिळ भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. ए आर रहमानने अनेकदा आपलं भाषेवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे.
ए आर रहमानने नुकतीच आपली पत्नी सायरा बानूसह एका अवॉर्ड शोला हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या पत्नीला हिंदीत न बोलता तामिळमध्ये बोल असं थोडं खडसावल्याच्या स्वरात सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.
ए आर रहमान सध्या आपला आगामी Ponniyin Selvan चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होण्याची वाट पाहत आहे. 28 एप्रिलला पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
ए आर रहमान तसा स्वभावाने फार शांत व्यक्ती आहे. त्याला जास्त बोलणं आवडत नाही. नुकतंच त्याने चेन्नईमधील विकातन अवॉर्ड शोमध्ये आपली पत्नी सायरा बानूसह हजेरी लावली. यावेळी ए आर रहमान पत्नीसह मंचावर उपस्थित होता. त्यावेळी अँकरने सायरा बानूला बोलण्याची विनंती केली. सायरा बानू बोलण्यास सुरुवात करणार इतक्यात ए आर रहमानने तिला सांगितलं की, "हिंदीत बोलू नकोस, तामिळमध्ये बोल".
கேப்புல பெர்பாமென்ஸ் பண்ணிடாப்ள பெரிய பாய்
ஹிந்தில பேசாதீங்க தமிழ்ல பேசுங்க ப்ளீஸ் pic.twitter.com/Mji93XjjID
— black cat (@Cat__offi) April 25, 2023
सायराला आपली मुलाखत वारंवार पाहण्यास आवडतं असं ए आर रहमानने यावेळी सांगितलं. सायराने यावेळी सांगितलं की "माफ करा, मी फार चांगली तामिळ बोलू शकत नाही. त्यामुळे मला तुम्ही माफ करा. मला फार आनंद होत असून उत्साही आहे. माझ्या पतीचा आवाज माझा आवडता असून, त्याच आवाजाच्या प्रेमात पडले इतकंच सांगू शकते".
ए आर रहमान सध्या काही चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. एर आर रहमानने संगीतबद्ध केलेला शिवकार्तिकेयनचा आयलान आणि उदयनिधी स्टॅलिनचा मामनन यावर्षी रिलीज होणार आहे. मैदान, पिप्पा, आदुजीविथम, लाल सलाम आणि गांधी टॉक्स हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.