close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणवीर- गावसकरांवर संचारलं शम्मी कपूरचं वारं....

त्यांचा हा अनोखा आणि बिनधास्त अंदाज एकदा पाहाच 

Updated: Jun 18, 2019, 09:05 AM IST
रणवीर- गावसकरांवर संचारलं शम्मी कपूरचं वारं....

मुंबई : World Cup 2019 रविवारचा दिवस जाऊन आता त्यावर आणखी दिवसही उलटले. पण, भारत- पाकिस्तान सामन्याच्या चर्चा मात्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. एखाद्या खेळाडूचं नाव असो, एखाद्या चाहत्याचा अंदाज असो किंवा मग आणखी काही. विविध मार्गांनी हा सामना चर्चेत आहे. यंदाचा विश्वचषक संपेपर्यंत या चर्चा काही शमणार नाहीत हेच चित्र दिसत आहे. खेळाडूच्या कामगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या सामन्याच्या वेळी अनेक सेलिब्रिटीचींही उपस्थिती पाहायला मिळाली होती. 

सेलिब्रिटींच्या या गर्दीत कॅमेऱ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंग याने. रणवीरचा अंदाज, त्याचा उत्साह सामन्याच्या वेळी ओसंडून वाहत होताच. पण, त्यादरम्यान, भारतीय संघातील माजी खेळाडूंसोबतचा त्याचा अंदाजही विशेष चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यासंबंधीचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासोबत रणवीर चक्क बिनधास्तपणे थिरकण्यात व्यग्र असल्याचं दिसत आहे. शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत 'बदन पे सितारे' या गाण्यावर रणवीर आणि गावस्कर हे दोघंही ठेका धरताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे यात रणवीरपेक्षा शम्मी कपूर यांच्या अगदी जवळ जाणाऱी नृत्यशैली असणाऱ्या गावस्कर यांचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

क्रिकेटचा सामना असो किंवा मग एखाद्या पुरस्कार सोहळ्याचं व्यासपीठ. रणवीरची उपस्थिती असल्यावर प्रत्येक ठिकाणी धमाल, मस्ती होणार यात शंकाच नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून रणवीरने भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील काही खास क्षण सर्वांच्याच भेटीला आणले आहेत. ते पाहता, मौका भी था दस्तूर भी.... असं म्हणत रणवीरने चांगलाच कल्ला केल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून देण्यात येत आहे.