VIDEO : ऑलिम्पिक पदक विजेत्या मायकल फेल्पसोबत कतरिनाचा 'वर्क आऊट'

कतरिनाने व्हिडिओ शेअर करत लिहिलं... 

Updated: Mar 28, 2019, 02:19 PM IST
VIDEO : ऑलिम्पिक पदक विजेत्या मायकल फेल्पसोबत कतरिनाचा 'वर्क आऊट' title=

मुंबई : चित्रपट विश्वाचं नातं हे पक्त ठराविक गोष्टींपुरताच मर्यादीत राहिलं नसून, कला, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रांशीही ते जोडलं गेलं आहे. क्रीडा क्षेत्र आणि बॉलिवूड (चित्रपट विश्व)चं नातं तसं खासच. याच नात्याचा प्रत्यय अभिनेत्री कतरिना कैफ हिने पोस्ट केलेला एक व्हिडिओ पाहताना येत आहे. या व्हिडिओमध्ये ती जलतरण क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या आणि ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या मायकल फेल्प याच्यासोबत दिसत आहे. 

कतरिनाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये तिने फेल्पची भेट घेतल्याचा आनंद पाहायला मिळाला. कलाकार आणि क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या, की कोणत्यातरी अफलातून गोष्टीचीच ती नांदी असते असा अनेकांचाच समज आहे, अर्थात काही उदाहरणांमुळे हा समज आणखी दृढ झाला आहे. त्यामुळे आता बी- टाऊनची ही अभिनेत्री आणि मायकल फेल्प कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दरम्यान, कतरिनाने मायकलसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला भेटण्याचा आनंद व्यक्त केला. 'एका अद्वितीय व्यक्तीमत्वाला, मायकल फेल्पला भेटण्याचा आनंद मी शब्दांतही व्यक्त करु शकत नाही आहे. तो खरंच अद्वितीय आहे. माझं म्हणाल तर मी काही खेळाडू (ऍथलिट) नाही. पण, वर्षानुवर्षांच्या नृत्याच्या सरावामुळे मला ठाऊक आहे, की अनेकदा तुमचे विचारच काही गोष्टींसाठी तुमच्या सीमा निर्धारित करतात. हे सारंकाही फक्त मनात असतं. त्यामुळे त्यावर ताबा ठेवता आलं की शक्यतांनाही सीमा उरत नाहीत', असं कॅप्शन तिने या व्हिडिओसोबत लिहिलं. 

कोणतंही लक्ष्य हे कधीच सोपं नसावं हा महत्त्वाचा संदेशही तिने या निमित्ताने चाहत्यांना दिला आहे. लक्ष्य अशी असावीत ज्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जोमाने काम कराल, असा प्रोत्साहनपर दृष्टीकोन देत तिने या कॅप्शनच्या माध्यमातून दिला. त्यामुळे एका अर्थी कतरिना आणि मायकल यांची ही भेट चाहत्यांसाठी एक प्रकारे परवणीच ठरत आहे.