'मुक्काला... मुकाबला'वर चक्क सीईओंनी धरला ठेका

व्हिडिओ पाहून अभिनेता वरुण धवनही भारावला... 

Updated: Feb 20, 2020, 12:29 PM IST
'मुक्काला... मुकाबला'वर चक्क सीईओंनी धरला ठेका title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : दैनंदिन जीवनामध्ये अनेकांची दिनचर्या ही जवळपास एकसारखीच असते. यामध्ये सर्वाधिक सहभाग असतो तो म्हणजे नोकरदार वर्गाचा. दिवसातील जवळपास सर्वाधिक तास कामाच्याच ठिकाणी व्यतीत करणाऱ्या या वर्गामध्ये अनेकदा चिडचीड, संताप आणि तणावाचं वातावरणही पाहायला मिळतं. पण, हेच वातारण हलकं करण्याची जबाबदारीही अप्रत्यक्षरित्या काही ठराविक व्यक्तींवर असते. 

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ पदांपासून ते अगदी कनिष्ठ पदांपर्यंत काम करणाऱ्या या मंडळीच्या चेहऱ्यावर असाच अनपेक्षित आनंद आणण्याचा प्रयत्न एका नामांकित कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच 'सीईओ' या पदावर असणाऱ्या एका व्यक्तीने केला आहे. 

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, दीपाली गोएंका.  Welspun India या कंपनीच्या सीईओ पदावर असणाऱ्या दीपाली यांनी अनेकांची मनं जिंकली आहेत ती म्हणजे त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे. 

RPG Groupच्या अध्यक्षपदी असणाऱ्या हर्ष गोएंका यांनी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये दीपाली 'स्ट्रीट डान्सर ३डी' या चित्रपटातील 'मुकाबला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे सीईओ पदावर असणाऱ्या दीपाली यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मंडळींसोबतच थिरकत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी असणारं गंभीर वातावरण काही काळासाठी का असेना, पण अतिशय उत्साही आणि आनंददायी केलं.

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यानेही सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून भारावल्याची भावना व्यक्त केली. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत त्याला दाद दिली आहे. नोकरीच्या ठिकाणी हवहवंसं वाटणारं वातावरण आणि तणावग्रस्त दिनचर्येतही मिळणारे काही अप्रतिम क्षण या व्हिडिओतून प्रत्यक्ष पाहता आले. तेव्हा आता आपल्या कामाच्या ठिकाणी अशी आनंदाची आणि वेगळेपणाची बरसात तुम्ही कधी करताय?