मुंबई : तरूणाई म्हणजे फक्त मुक्तछंदपणे आयुष्य जगणारी , समाजभान नसलेली पिढी या विचाराला छेद देत आज अनेक तरूण विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय काम करत आहेत. अशाच कृतीशील तरूणाईचं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी झी युवा तर्फे झी युवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येतं. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यंदाचे झी युवा सन्मान पुरस्कार २०२३ जाहीर झाले असून यामध्ये विविध १२ क्षेत्रातील तरूणांना या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं .गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २२ मार्च २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
झी युवा वाहिनी नेहमीच प्रत्येकाच्या कामाचं कौतुक करण्यासाठी पुढाकार घेत असतं. समाजाचं भविष्य घडवणारी तरूणाई हा समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. नवं काहीतर करून दाखवणारी, नव्या संकल्पनांना मूर्त रूप देणारी तरूणाई समाजासमोर आणून त्यांच्या शिरपेचात पुरस्काराचा तुरा रोवणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्काराकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. यावर्षीच्या झी युवा सन्मान पुरस्काराची प्रतीक्षा संपली असून गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २२ मार्च २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्यासह माझा व डेरीमिल्क यांचे या सोहळयाला सहकार्य मिळालं आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील १२ विभागातील कर्तृत्ववान तरूणाईची निवड या झी युवा सन्मान २०२३ या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. झी युवा संगीत सन्मान पुरस्कारासाठी सांगलीचे शाहीर प्रसाद विभूते यांची निवड करण्यात आली आहे. श्वेता आणि पंकज महाली या यवतमाळच्या दांपत्याने झी युवा बळीराजा सन्मान या पुरस्कारावर नाव कोरले आहे. गडचिरोलीच्या अमृत बंग यांना झी युवा सामाजिक जाणीव सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर ॲग्रो उत्पादन करणाऱ्या सोलापूरच्या अनिता मांगले यांची निवड झाली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने झी युवा तेजस्वी चेहरा या विभागात बाजी मारली आहे. वारली पेंटिंगमध्ये काम करणाऱ्या पालघरच्या तुषार वैद्य यांना झी युवा कला सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सोलापूरची कन्या आंतरराष्ट्रीय टेनिस पटू प्रार्थना ठोंबरे हिने झी युवा क्रीडा सन्मान पुरस्कारावर नाव कोरले आहे. ज्ञानेश्वर जाधवर या सोलापूरच्या तरूण लेखकाची निवड झी युवा साहित्य सन्मान या विभागातील पुरस्कारासाठी झाली आहे. मुंबईच्या आयआयटीमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. वरूण भालेराव यांना झी युवा विज्ञान आणि तंत्रज्ञान सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
तरूण नेतृत्व अशी ओळख कमावलेल्या ठाणे येथील खासदार श्रीकांत शिंदे यांना झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. तरूण वयात शिक्षण क्षेत्रात एकलव्य मूव्हमेंटमधून कल्पक संकल्पना राबवणाऱ्या बुलढाणा येथील राजू केंद्रे यांना झी युवा शैक्षणिक कार्य सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदलातील आरोग्य विभागात सैनिकांच्या मानसिक सबलीकरणासाठी काम करणाऱ्या मेजर आश्लेषा तावडे यांना झी युवा संजीवनी सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २२ मार्च २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.