Ayurvedic Juice For Summer: उन्हाचा झळा जगणं हैराण करत आहेत. नुकताच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाला. यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. वातावरण इतकं तापलेलं असतं की, या दिवसात फक्त पाणी आणि ज्यूस सारखे पेय पियावेत असं वाटत असतं. अशावेळी शरीराला नुकसान देखील होणार नाही याची देखील काळजी घ्या. उन्हाळ्यात कायम शरीर आतून थंड असणे गरजेचे आहे. कारण यामुळे उष्माघात किंवा उन्हामुळे होणारे त्रास टाळता येतात. अशावेळी या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी हे पेय नक्कीच मदत करतील. जाणून घ्या आयुर्वेदिक ज्यूसबद्दल.
सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी कोरफडीचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये पोषक तत्वांचा भांडार आहे. यामध्ये हेल्दी व्हिटॅमिन्स, मिनरल्स तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. कोरफडीचा रस शरीर आतून शांत करतो आणि पचनसंस्था सुधारतो. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. हे फायदेशीर रस चयापचय वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. कोरफडीचा रस देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
बेलचा चवदार रस तुम्हाला उन्हाळ्यात आराम देईल. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. बेलच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यासोबतच यामध्ये पाचक एन्झाईम्स देखील असतात. अशा स्थितीत ते पचनसंस्था निरोगी ठेवते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यास आणि पोटातील अल्सर रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे. हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य देखील सुधारते.
आवळ्याचा रस आरोग्यासाठी अमृत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. आवळा रस व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जो रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतो. यासोबतच आवळ्याच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे सूज कमी होते. या रसामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.
जर तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळवायचा असेल आणि मधुमेहावरही नियंत्रण मिळवायचे असेल, तर कारले आणि जांभूळ मिश्रित रस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारल्यामुळे ग्लुकोजची पातळी स्थिर राहते. जांभूळ स्वादुपिंड निरोगी ठेवते. या मिश्रित रसामुळे उच्च रक्तदाब, अपचन आणि यकृताच्या समस्याही दूर होतात. हे डोळे, त्वचा आणि केसांसाठी देखील चांगले आहे.
नोनी रस हा अतिशय आरोग्यदायी ज्यूस आहे. नोनी ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. या रसामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत जे डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि संधिवात वेदनापासून आराम देतात. याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच पचनसंस्था सुधारते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)