मुंबई : कोरोना व्हायरसच्या नवा Omicronने जगभरातील लोकांची झोप उडवली आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर भारत सरकारने नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी तयारी वाढवली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या या 6 जणांमध्ये Omicronया नवीन व्हेरिएंटची अजून पुष्टी झालेली नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सांगितलं की, कोरोना बाधित आढळलेल्या लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. यासोबतच त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केलं जातंय.
महाराष्ट्रातील भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमात 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याआधी सोमवारी वृद्धाश्रमात 62 लोकांना कोविड-19ची लागण झाल्याचं आढळलं होतं. त्यानंतर इतर 52 जणांची तपासणी करण्यात आली होती.
या 17 जणांच्या अँटीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र त्यांचा अहवाल आरटी-पीसीआरमध्ये पॉझिटिव्ह आला असून त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. भिवंडीतील वृद्धाश्रमात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतांश लोकांना कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत.