सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.   

शिवराज यादव | Updated: Sep 20, 2024, 08:07 PM IST
सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली title=

सिरियामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. 20 वर्षीय तरुणाचं सहा वर्षांपासून नाक गळत होतं. सामान्य सर्दी आहे असं समजत त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर यामागे ब्रेन लीकेज खरं कारण असल्याचं उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. 

तरुणाला डोकेदुखी जाणवत होतं, तसंच झटके देखील येत होते. त्याला सुरुवातीला ही सगळी सर्दीची लक्षणं आहेत असं वाटत होतं. पण ते त्याच्या कवटीच्या छिद्रातून गळणारे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (cerebrospinal fluid - CSF) होते. मेंदू आणि मणक्याचे रक्षण करणारा द्रव त्याच्या अनुनासिक पोकळीत (nasal cavity) शिरला होता.

सहा वर्षांपूर्वी तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जखम झाली होती. अखेरीस डॉक्टरांनी त्याला आघातजन्य एन्सेफॅलोसेलचे निदान केलं. ही अशी स्थिती असते ज्यामध्ये मेंदूतील पदार्थ कवटीच्या छिद्रांमधून बाहेर पडतात, सामान्यतः एन्सेफॅलोसेल हा एक दुर्मिळ जन्मदोष आहे, परंतु या प्रकरणात तो अपघातामुळे झाला होता. सुरुवातीला, अपघातानंतर तरुणाने दुखापतींवर उपचार करण्यास नकार दिला होता. दरम्यान नाक सतत वाहत असल्याने रुग्णालयात जाण्याच्या दोन महिने आधी त्याला मेनिंगोएन्सेफलायटीस (meningoencephalitis) म्हणजेच मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या पडद्याचा संसर्ग झाला.

अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी एमआरआय स्कॅन केलं. यामध्ये कवटीचे फ्रॅक्चर आढळून आले. तसंच त्याच्या अनुनासिक पोकळीत एन्सेफॅलोसेल आढळून आले. मेंदू आणि मणक्याचे संरक्षण करणारे त्याचे ब्रेन टिश्यू आणि मेनिन्जेस फ्रॅक्चरमधून बाहेर पडत असल्याचे आढळलं.

सुरुवातीला फ्रॅक्चर दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊनही तरुणाने नकार दिला होता. अखेर दोन महिन्यांनंतर तो हॉस्पिटलमध्ये परतला आणि शेवटी ऑपरेशनला होकार दिला.

शस्त्रक्रियेदरम्यान, न्यूरोसर्जन्सनी तरुणाच्या ब्रेन टिश्यूची जागा बदलली आणि खराब झालेले मेनिंजेस दुरुस्त केले. त्याच्या कवटीच्या खालील भागात जिथे फ्रॅक्चर झालं होतं तिथे वैद्यकीय दर्जाचे सिमेंट आणि गोंद वापरून नीट करण्यात आलं. यशस्वी प्रक्रियेनंतर, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणामुळे वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करणं किती महाग पडू शकते हे अधोरेखित झालं आहे. अनेकदा किरकोळ जखमाही पुढे जाऊन गंभीर होऊ शकतात.