रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांनी खेळा होळी; जाणून घ्या कसे बनवाल नैसर्गिक रंग

'हॅप्पी होळी'सह साजरी करा 'हेल्दी होळी'

Updated: Mar 21, 2019, 12:22 PM IST
रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांनी खेळा होळी; जाणून घ्या कसे बनवाल नैसर्गिक रंग  title=

मुंबई : यंदा होळी आणि रंगपंचमीचा सण आनंदात, उत्साहात साजरा कराच पण त्यासोबत तुमची होळी खऱ्या अर्थाने हेल्दी, नैसर्गिकरित्या साजरी करा. आरोग्याला हानीकारक असणाऱ्या रासायनिक रंगाचा वापर न करता घराच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करा. रंगपंचमीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांमुळे अनेकवेळा शरीराच्या अतिसंवेदनशील भागाला मोठी दुखापत होण्याचा संभंव असतो. त्यामुळे रासायनिक रंगांचा वापर टाळून आपला सण उत्साहात, आनंदात आणि तितकाच आरोग्यदायक करूया. 

होळीच्या सणासाठी रंगबेरंगी गुलाल आणि पिचकाऱ्यांनी बाजारे सजली आहेत. अशातच बाजारात रासायनिक रंगही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या रंगांना सुगंधी आणि चकमकीत बनवण्यासाठी हानीकारक केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या त्वचेला मोठे नुकसान होते. या रासायिनक रंगांमुळे त्वचेची आग होते तसेच डोळ्यांवरही रंगांचा विपरीत परिणाम होतो. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर अनेकांना तीव्र डोकेदुखीचाही त्रास होतो. रासायनिक रंगांमुळेच हा त्रास होतो. त्यामुळे होळीचा आनंद छोट्याशा कारणाने बिघडू नये कोणालाही या रायायनिक रंगांमुळे अपाय होऊ नये यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करा. 

घरच्या-घरी नैसर्गिक रंग कसे तयार कराल

स्किन केयर एक्सपर्टनी नैसर्गिक रंग बनवण्याबाबत माहिती दिली आहे. हिरवा रंग तयार करण्यासाठी पालक, लाल रंगासाठी बीट, गुलाबी रंगासाठी गुलाब, पिवळा रंग तयार करण्यासाठी हळद किंवा झेंडूच्या फुलाचा वापर केला जाऊ शकतो. जो रंग तयार करायचा आहे, त्या रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. त्या पेस्टमधून त्याचे पाणी वेगळे करा. त्यानंतर कणीक मळून त्यात हव्या त्या रंगाचे पेस्टमधून वेगळे केलेले पाणी टाका. त्याला चपातीसारखे लाटा. यात सुगंधासाठी एरोमा लिक्विड मिस्क करा. पीठ सुकल्यानंतर त्याची पावडर करा. अशाप्रकारे नैसर्गिक रंग तयार करा.

रायासनिक रंगांचा वापर टाळून घरच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करा. आनंदाच्या सणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची इजा न होऊ देता नैसर्गिक, हर्बल होळी खेळा आणि आपला आनंद अधिक द्विगुणीत करा.