मुंबई : जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. काही महिन्यांपूर्वी जी परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र होतं, ती परिस्थिती पुन्हा बिघडताना दिसते. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून येताना दिसत असून मृतांचा आकडाही वाढला आहे. हे बदलणारे ट्रेंड लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय की, आपण आता कोरोनाच्या आणखी नवीन लाटांसाठी तयार राहिलं पाहिजे. कोरोनाचे जे नवीन व्हेरिएंट समोर येत आहेत, त्या सर्वांचं स्वरूप वेगळं आहे. ते अधिक वेगाने पसरत असल्याचं दिसतंय.
रुग्णांची संख्या जितकी वाढेल तितकी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढेल. या बदलत्या परिस्थितींसाठी प्रत्येक देशाला कृती आराखडा तयार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. सौम्या स्वामीनाथन यांनीही हे ट्विट जागतिक बँकेचे सल्लागार फिलीप शेलेकेन्स यांच्या ट्विटवर केलंय.
फिलिप शेलेकेन्सच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि जपानमध्ये सध्या श्रीमंत देशांमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली जातायत. त्याचबरोबर उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्राझील आघाडीवर आहे.
डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी देखील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मृतांच्या संख्येत वाढ होणं हे चांगलं लक्षण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी स्पष्ट केलंय की, कोरोना अजून संपलेला नाही आणि आगामी काळात आणखी कोरोनाच्या लाटा दिसू शकतात.
गेल्या आठवड्यात 5.7 दशलक्ष कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, जी आधीच्या तुलनेत 6 टक्के अधिक होती, यावरूनही याचे संकेत मिळत आहेत. मृतांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे 9800 लोकांनी आपला जीव गमावला.