औरंगाबाद : थॅलेसिमिया या आजाराबद्दल आपल्या समाजात अजूनही पुरेशी जनजागृती नाहीये. अनुवांशिकरित्या जीन्समधून काही शारीरिक गुणधर्म आई वडिलांकडून बाळाकडे जातात. अशाच एक आजार म्हणजे थॅलेसिमिया. थॅलेसिमिया हा एक रक्तातील विकार असून या रूग्णांना नियमितरित्या रक्ताची गरज भासते. त्यामुळे लग्न जुळवण्यापूर्वी पत्रिका पाहण्याऐवजी थॅलेसेमियासंदर्भातील टेस्ट करून घेणं गरजेचं मानलं जातं.
लग्न करताना मुला-मुलींनी किंवा बाळाचा विचार करण्यापूर्वी थॅलेसेमियाशीची टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पालकांकडून हा आजार मुलांकडे जाणार नाही. लग्नाआधी सर्वांनी ही टेस्ट करावी यासाठी औरंगाबादमध्ये थॅलेसेमिया सोसायटीच्या श्री सत्यसाई रक्तपेढी वतीने आवाहन करण्यात येतंय.
थॅलेसेमिया मायनर असलेल्या जोडप्याचं मूल हे थॅलेसेमिया मेजर असू शकतं. मुख्य म्हणजे थॅलेसेमिया मेजर असलेल्या बाळाला आयुष्यभर दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने रक्त चढवावं लागतं. असं न झाल्यास ते जीवावर बेतण्याची शक्यता असते.
थॅलेसिमियाचे दोन प्रकार आहेत. एक मेजर आणि दुसरा मायनर. थॅलेसिमिया या आजारामध्ये लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्त पेशींची योग्य प्रकारे निर्मिती होत नाही. त्याचप्रमाणे या लाल रक्तपेशींचं आयुष्यही फार कमी असतं.
या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांना काही कालावधीमध्ये एक युनिट रक्ताची गरज असते. या रूग्णांना इतर आजार जडण्याचाही धोका अधिक असतो.
नुकतंच औरंगाबादमध्ये अडीच महिन्यांत थॅलेसेमियाचे दहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत व हे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येतेय.