बहिणींंसोबत वाढणारी मुलं या '4' गोष्टींमध्ये खास असतात

दोन बहिणी किंवा भावापेक्षा एक भाऊ आणि एक बहीण असणार्‍यांचं नातं खास असतं.   

Updated: May 14, 2018, 06:34 PM IST
बहिणींंसोबत वाढणारी मुलं या '4' गोष्टींमध्ये खास असतात  title=

 मुंबई : दोन बहिणी किंवा भावापेक्षा एक भाऊ आणि एक बहीण असणार्‍यांचं नातं खास असतं. ब्रिटीश मानसशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींसोबत वाढणार्‍या मुलांमध्ये आत्मनिर्भरता अधिक प्रमाणात आढळून येते. सोबतच बहिणींसोबत मोठं होताना त्यांच्यावर काही कळत नकळत संस्कार होतात.  पहा कोणत्या गोष्टींमध्ये अग्रेसर असतात बहिणींसोबत वाढणारी मुलं ...  
 

 मानसिकदृष्ट्या अधिक सबळ -   

 जर्नल ऑफ फॅमिली सायकोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, बहीण आपल्या भावाला मानसिकदृष्ट्या सबळ आणि आत्मसन्मान वाढवण्यास मदत करते. बहिण भावाचं नातं एकमेकांना मानसिकदृष्ट्या सकारात्मक करण्यास मदत करते. त्यामुळे त्यांच्यामधील एकटेपणाची भावना, दोषी भाव, आत्मविश्वास कमी असणं अशा गोष्टी कमी होतात.  

 विनम्र राहण्यास मदत -  

 बहिण असणारी मुलं विनम्र आणि दयाळू स्वभावाची असण्याचं प्रमाण अधिक असतं. मुलींमधील सकारात्मकता, परोपकार, प्रेम भावना त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम करते. बहिण भावांमध्ये सतत वाद होत असतील तर त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवता येईल हे शिकणं गरजेचं आहे. 

 जीवनातील चढउतार -  

 द सिब्लिंग इफेक्टचे लेखक जेफरी क्लुगरच्या माहितीनुसार, भावा-बहिणीतील नातं खास असतं. कोणत्याही भांडणाशिवाय वाईट परिस्थितीतूनही मार्ग काढला जाऊ शकतो हे शिकवल्यास त्याचा फायदा होतो. बहिणीसोबत राहणारी मुलं जीवनात चढ उतार आला तरीही त्याला अधिक सक्षमतेने हाताळू शकतात. इतरांच्या तुलनेत ही मुलं अधिक आशादायी राहू शकतात.  

 संवादकौशल्य सुधारते - 

बहिणींसोबत वाढणार्‍या मुलांमध्ये मुलींशी बोलण्याचा आत्मविश्वास अधिक चांगला असतो. बहिणींशी मुलं काही गोष्टी थेट पडताळून पाहू शकतात. त्यांच्या भावनिक, मानसिक रिअ‍ॅक्शन कशा असतील याचा अंदाज असल्याने मुलांना फायदा होतो.