सामाजिक न्यायमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच संजय शिरसाट कामाला लागले आहेत. आक्रमकपणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले संजय शिरसाट यांचं ते मंत्री झाल्यावर लगेचच आक्रमक रुप पाहायला मिळालं. संभाजीनगरमध्येच त्यांनी समोर असलेल्या सर्वांना चांगलंच धारेवर धरलं. यासाठी नेमकं काय कारण ठरलं, हे जाणून घेऊयात यात
जर्जर झालेल्या इमारती, किचनमध्ये घाणीचं साम्राज्य. खिडक्या, दरवाजे तुटलेली स्वच्छतागृह. ही भयानक अवस्था आहे, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी खात्याची सूत्र हाती घेतल्यानंतर संभाजीनगरच्या वसतिगृहांची पाहणी केली. या पाहणीतलं वास्तव धक्कादायक होतं. वसतिगृह म्हणावा की कोंडवाडा अशी अवस्था होती. वसतिगृहाची इमारत जुनाट झाली होती. अनेक ठिकाणी खिडक्या, दरवाजे गायब होते. वसतिगृहासाठी पाच कर्मचारी मंजूर असताना तीन कर्मचारी गायब होते. ही सगळी अवस्था पाहून संजय शिरसाटांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
गावखेड्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसल्यानं अशा गलिच्छ ठिकाणी राहावं लागलंय. वसतीगृहातल्या असुविधांबाबत तिथं राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
संजय शिरसाटांनी वसतिगृहाच्या अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलंय.
वसतीगृहातल्या जेवणाची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्या त्यांनी हातात घेऊन पाहिल्या. जनावरांपेक्षाही भयानक अवस्थेत विद्यार्थी राहत असल्याचं त्यांनी कबुल केलं.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची अवस्था वर्षानुवर्ष तशीच आहेत. मंत्री आले गेले, सरकारं आली गेली. विद्यार्थ्यांना सोसाव्या नरकयातना तशाच आहेत. किंबहुना त्यात आणखी वाढ झाली.. आता शिरसाटांनी पाहणी केलीय. हे चित्र किमान त्यांच्या काळात तरी बदलेल अशी अपेक्षा आहे.