Budget 2024 : मंगळवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर केलं. यावेळच्या अर्थसंकल्पात त्यांनी कॅन्सरच्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, औषधांवरील कस्टम ड्युटीमध्ये सूट दिल्याने कॅन्सरवरील रुग्णांना उपचार होणं सोपं होणार आहे. ज्या कॅन्सरच्या औषधांवर सूट देण्यात आली आहे, त्यांचा बाजारात किती खप आहे? ते कोणत्या कॅन्सरच्या उपचारांसाठी वापरले जातात आणि ती किती स्वस्त होतील? हे जाणून घेऊया.
कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. ज्यावेळी स्तनाचा कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो तेव्हा त्याचा वापर केला जातो. यानंतर दुसऱ्या औषधाचं नाव ओसिमेर्टीनिब आहे. ही फुफ्फुसाच्या कर्करोगावर (NSCLC) उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लक्ष्यित थेरपी आहे. तिसऱ्या औषधाचं नाव दुर्वालुमब आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध आहे. हे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) च्या उपचारांसाठी वापरण्यात येतं.
Trastuzumab Derextecan हे औषध अमेरिकेतून आयात करावं लागतं. हे AstraZeneca ने बनवलं असून त्याची किंमत सुमारे 2 ते 3 लाख रुपये आहे. त्याच वेळी, ओसिमरटिनिबची किंमत 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. दुर्वालुमबच्या दोन डोसची बाजारातील किंमत 1 ते 1.5 लाख रुपये आहे. ऑनलाइन औषध विक्रेत्यांच्या मते, ब्रँडच्या नावानुसार या तिन्ही औषधांची किंमत कमी-अधिक असण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परदेशातून आयात केलेली औषधं खूप महाग आहेत. कस्टम ड्युटी हटवल्यानंतर ही औषधं स्वस्त होणार आहेत. रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण ही औषधं ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कर्करोगाच्या उपचारात वापरली जातात. या दोन्ही कॅन्सरची प्रकरणं भारतात झपाट्याने वाढताना दिसत असल्याचं चित्र आहे.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम ड्युटीमध्ये सूट मिळाल्याने ही औषधे 10 ते 20 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. याचाच अर्थ जर एखादी व्यक्ती Trastuzumab Dextecan चा डोस 2 लाख रुपयांना विकत घेत असेल, तर कस्टम ड्युटी हटवल्यानंतर त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कस्टम ड्युटी हटवल्यानंतर कॅन्सर रुग्णांवरील आर्थिक बोजा कमी होणार आहे. पूर्वीपेक्षा जास्त लोक उपचार घेऊ शकणार आहेत.