विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद : कर्करुग्णांसाठी तसंच कॅन्सरची रिस्क असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या काही महिन्यांमध्ये कॅन्सरची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लस शोधत असताना कर्करोगावरच्या लसीचा शोध लागला आहे. आतापर्यंत कॅन्सरवर लस नव्हती किंवा ठोस असं औषध नव्हतं अनेक उपचार आहेत मात्र ही लस जास्त चांगल्या पद्धतीनं काम करून शकेल असा विश्वास आहे.
जीवघेण्या कॅन्सरवरही आता लस उपलब्ध होणार आहे. जर्मनीच्या बायोएनटेक लॅबमध्ये यावर महत्त्वाचं संशोधन झालं आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस शोधताना ट्युमरविरोधात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकाचा शोध लागला आहे. सर्वकाही ठीक राहिलं, तर येत्या दीड-2 वर्षांत कॅन्सरवर लस येण्याची शक्यता आहे.
कोविड-19 व्हॅक्सिन मेसेंजर आरएनए किंवा एम-आरएनए शरिरातील प्रतिरोधक यंत्रणेला सक्षम बनवतो. जेनेटिक कोडचा आणखी लहान भाग असलेला एम-आरएनए पेशीमध्ये प्रोटीन तयार करतो. त्यामुळे सुरक्षित अँटीबॉडीज् तयार होतात. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या या प्रोटीन्सवर संशोधन करताना कॅन्सरच्या पेशींचा मुकाबला करणाऱ्या लसींवरही चाचण्या करण्यात आल्यात.
कॅन्सरची लस आल्यानंतर किमोथेरपी, रेडिओथेरपीच्या वेदनांमधून रुग्णांना कायमची मुक्तता मिळू शकेल. कॅन्सरची हाय रिस्क असलेल्या लोकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे. विशिष्ट कर्करोग होण्याचा धोका असलेल्यांसाठी लस तयार केली जाऊ शकते.
तोंडात घशाच्या मागचा कर्करोग (ऑरोफेरीन्जियल कॅन्सर), गर्भाशयाचा कर्करोग (सर्व्हाइकल कॅन्सर), स्तनाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर आणि विविध प्रकारच्या ट्यूमरवर ही लस प्रभावी ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र अनेक प्रकारच्या कर्करोगांसाठी एकच लस तयार करणं कठीण असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. असं असलं, तरी या संशोधनामुळे कर्करुग्णांना आणि त्याचा धोका असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे