मुंबई : सरत्या वर्षाला तर साऱ्या जगानं निरोप दिला. नव्या वर्षाचं स्वागतही केलं. पण, मागच्या वर्षातील कोरोना (Coronavirus) ची महामारी मात्र मागे सोडून येणं कोणालाही जमलेलं नाही. उलट नव्या वर्षात या संसर्गाची तिसरी लाट अधिक तीव्रतेनं धडकली.
ओमायक्रॉन (omicron) या नव्य़ा व्हॅरिएंटमुळं कोरोनाचं आणखी नवं रुप सध्या सर्वांना पाहायला मिळालं. परिणामी अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण दिसलं.
भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 9 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मुख्य म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांनाही कोरोनानं गाठल्य़ाचं पाहायला मिळत आहे.
लहानग्यांमध्ये या संसर्गादरम्यान, सर्दी-थंडी (cough and cold) आणि तापाची लक्षणं दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य वेळी येणारा ताप कोणता आणि कोरोनामुळं येणारा ताप कोणता हे पालकांच्या लक्षात येत नाही आहे.
बाळाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला तर नाही ना, हीच एक चिंचा सध्या पालकांमध्ये पाहायला मिळत आहे.
अशा वेळी मुलांची नेमकी काय काळजी घ्यावी आणि केव्हा डॉक्टरकडे जावं यासाठीचं हे मार्गदर्शन.
- नेहमीच्या सर्दीमध्ये सहसा घसा खवखवतो आणि नाक वाहतं. दोन तीन दिवसांनी खोकला सुरु होतो. काहींना ताप आणि डोकेदुखीची समस्याही सतावते.
- जर तुमच्या बाळाला ताप आणि कोरडा खोकला असेल तर सतर्क राहा. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास कोरोनाची चाचणी करुन घ्या.
- फक्त नाकातून पाणी येत असल्याच घाबरण्याचं कारण नाही. कारण तापमान कमी झाल्यास असे बदल शरीरात होतात.
- घशात जडपणा आणि हलकी खवखव असेल तरीही घाबरून जाऊ नका, कारण हेसुद्धा वातावरणातील बदलांमुळे होताना दिसतं. त्यामुळं बाळाचं नाक वाहतंय आणि घसा खवखवतोय तर हा कोरोना नाही.
- ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास सहसा सतत शिंक येणं, डोकं धरणं, खोकला येणं अशी लक्षणं दिसतात.
लहान मुलांमध्ये प्रत्येक मुलाच्या शरीरानुसार आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कमी जास्त प्रमाणानुसार हे बदल शरीरात होताना दिसतात. ज्यामुळं लक्षणं अधिक तीव्र असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वरील संदर्भ सर्वसाधारण माहितीवर आधारित आहेत. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)