जगभरात कोविडचे रुग्ण वाढले! WHO ने दिला सतर्कतेचा इशारा, 'या' देशात वाढू शकतात रुग्ण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात पुन्हा चिंता वाढवली आहे

Updated: Mar 17, 2022, 02:09 PM IST
जगभरात कोविडचे रुग्ण वाढले! WHO ने दिला सतर्कतेचा इशारा, 'या' देशात वाढू शकतात रुग्ण title=

Covid-19 Worldwide Cases : गेली दोन वर्ष जगभरात थैमान घातलेल्या कोविड-19 (COVID-19) ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. जगभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आशियाई देशांमध्ये याचा जास्त परिणाम जाणवत आहे. चीनमधील जिलिन प्रांतात कोविडची वाढती प्रकरणे पाहता लॉकडाऊन लागू करावा लागला आहे.

ओमायक्रॉन (OMICRON) आणि त्याचा उपप्रकार BA.2 ची लागण होत असल्याचं WHO ने म्हटलं आहे. हा प्रकार घातक नसला तरी त्याचा वेगाने फैलाव होत आहे. कोविड नियमांकडे होणारं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा ही कोविड प्रकरणांमध्ये वाझ होण्याची कारणं आहेत, असं WHO ने म्हटलं आहे. 

अनेक देशांमध्ये चाचणीचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे हे आकडे कमी आहेत. प्रत्यक्षात बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असं WHO ने म्हटलं आहे. काही देशांमध्ये लसीकरणाचे कमी दर हे देखील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचं कारण आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत जागतिक स्तरावर नवीन संसर्गामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 7-13 मार्च दरम्यान 1.1 कोटी नवीन प्रकरणे आणि 43,000 हून अधिक मृत्यूची नोंद झाली. जानेवारीअखेरची ही पहिलीच वाढ आहे. आशियाई देशांमध्ये जास्त वाढ दिसून आली आहे, यात दक्षिण कोरिया आणि चीन या देशांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या देशांत नवीन कोविड प्रकरणांमध्ये 25 टक्के आणि मृत्यूंमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. आफ्रिकेतही नवीन प्रकरणांमध्ये 12 टक्के आणि मृत्यूंमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. युरोपमध्ये कोविड रुग्णसंख्येत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, पण मृत्यूमध्ये मोठी वाढ झालेली नाही. 

BA.2 सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट
ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स आणि यूकेमध्ये मार्चच्या सुरुवातीपासूनच प्रकरणे वाढत असताना युरोपला आणखी एका कोरोनाव्हायरस लाटेचा सामना करावा लागत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  WHO च्या मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की BA.2 हा आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असल्याचं समोर आलं आहे.

पण दिलासादायक म्हणजे असे कोणतेही संकेत नाहीत की या व्हेरिएंटमुळे गंभीर आजार होऊ शकतो. डेन्मार्कमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली होती. यात बहुतांश रुग्णांना BA.2 ची लागण झाली होती.